हडपसर प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, लोकनेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून सप्ताह साजरा करण्यात आला. शरदचंद्रजी पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून *पुरोगामी महाराष्ट्र आणि समकाळ* या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख सुप्रसिध्द समीक्षक प्रा. डॉ. सुधाकर शेलार उपस्थित होते.
उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,” म. फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा म्हणजे सध्याचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. महापुरुष जसे बोलायचे तसे वागायचे. त्यामुळे त्यांनी समाजामध्ये आपल्या विचारांचा आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष महाराष्ट्रामध्ये जन्मले व त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली. १९ व्या शतकामध्ये कर्मकांडामध्ये अडकलेल्या समाजाला नवी दिशा दाखवण्याचे कार्य समाज सुधारकांनी केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस घडविण्याचे कार्य सुरू केले. त्यांचा हा वसा आणि वारसा घेऊन हे शैक्षणिक कार्य वर्तमानात पुढे नेण्याचे कार्य संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार करत आहेत. शरदचंद्रजी पवार हे पुरोगामी विचारांचे नेते आहेत. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून सामाजिक परिवर्तन केले. त्यामुळे आजच्या तरुणांनी महाराष्ट्राचे पुरोगामीत्व शाबूत राखण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचा वारसा जतन करावा असे मत डॉ.सुधाकर शेलार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे म्हणाले की, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यामुळे बहुजन समाजातील तळागाळातील मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येता आले. तसेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार हे पुरोगामी विचारांचे असल्यामुळे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तन केले. असे मत उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ.अतुल चौरे यांनी तर आभार प्रा.राधाकिसन मुठे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता कदम व प्रा.नयना शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य ज्ञानदेव जाधव, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. शहाजी करांडे तसेच महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.