पाच वर्षांनंतर शालेय क्रीडा स्पर्धांचा जल्लोष*
महाबळेश्वर: महाबळेश्वर नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा चषक क्रीडा महोत्सव २०२४’ चा शानदार शुभारंभ झाला. मुख्याधिकारी योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून तब्बल पाच वर्षांनंतर या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शहरातील १३ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे.
*भव्य रॅली आणि उद्घाटन सोहळा:*
महोत्सवाची सुरुवात १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून शहरातील नगरपरिषद आणि खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या भव्य क्रीडा रॅलीने महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. रॅली मुख्य बाजारपेठ मार्गे गोल्फ मैदानावर पोहोचली.
गोल्फ मैदानावर खेळाडूंचे संचलन आणि मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि सध्या अप्पर पोलीस अधीक्षक असलेले विजय चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, उद्योगपती रमेश पलोड, माजी नगरसेवक सुनील शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
*विविध क्रीडा प्रकारांचा समावेश:*
गेली पाच वर्षे बंद असलेला हा शालेय क्रीडा महोत्सव नव्या उत्साहात सुरू झाला आहे. महोत्सवात एकूण ११ प्रकारचे खेळ असून, मुला-मुलींच्या ४ गटांमध्ये स्पर्धा होणार आहेत. विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक खेळाडूला नगरपरिषदेच्या वतीने टी-शर्ट आणि कॅप देण्यात आली आहे.
*जनरल चॅम्पियनशिप आणि विशेष आकर्षण:*
या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक गटातील मुला-मुलींच्या संघांना जनरल चॅम्पियनशिप चषक प्रदान करण्यात येणार आहे. हा चषक विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेचा आणि शालेय संघाच्या एकत्रित प्रयत्नांचा गौरव असेल, असे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.
“मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध शाळांमधील शिक्षक असे सुमारे ४० जण हे क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. महाबळेश्वरमधील नागरिक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी या महोत्सवाला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे”.