बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या घटनेची पागोटे मध्ये पुनरावृत्ती
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली व संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली ही घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पागोटे येथे एक पुन्हा एकदा तशीच पुनरावृत्ती घडली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्त्या प्रकरणाची पुनरावृत्ती पागोटे येथे झाल्याने पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेल्या सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पागोटे गावचे सरपंच कुणाल अरुण पाटील वय २८,धंदा व्यवसाय, राहणार पागोटे, पोस्ट जेएनपीटी, तालुका उरण, जिल्हा रायगड हे पागोटे गावात त्यांच्या कुटुंबासह राहतात. ते सरपंच असून त्यांचे मे. एक्सप्रेस लॉजिस्टिक नावाने कंपनी कार्यरत आहे. सरपंच कुणाल पाटील हे अनेकवर्षे गावात व गावच्या आजूबाजूच्या परिसरात समाजप्रबोधनाची कामे करतात. व्यावसायिक कामे, शिवसेना शाखेची कामे व समाजप्रबोधनाची कामे हे नवघर कुंडेगाव रस्त्यावर ता- उरण, जिल्हा रायगड येथील कंटेनर केबिनच्या ऑफिसमधून करीत असतात. दिनांक ९/१०/२०२४ रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास सरपंच कुणाल पाटील हे कुंडेगाव नवघर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कंटेनर ऑफिस मध्ये काम करीत असताना काही इसम आरडा ओरड करत ऑफिसच्या बाहेर आले. व त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत, धमकी देत सरपंच कुणाल पाटील व त्यांच्या दोन साथीदारांवर जीवघेणा हल्ला केला. अत्यंत भयानक असा हा हल्ला होता. जीवे ठार मारण्यासाठी आलेले इसमांनी लाथा बुक्क्यानी मारहाण केली. बंदुके व तलवारीही त्यांनी सोबत आणली होती. मात्र सिसिटीव्ही कॅमेरा असल्यामुळे सदर इसमानी आपली हत्यारे लपविली. सिसिटीव्ही कॅमेरे पाहताच आरोपीनी तेथून लगेच पळ काढला. जीवघेणा हल्ला झाल्याने सरपंच कुणाल पाटील व त्यांचे दोन साथीदार यांनी लगेचच इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय उरण येथे हॉस्पिटल मध्ये जाऊन त्वरित उपचार घेतले.
मात्र यावेळी सरपंच कुणाल पाटील व त्यांचे दोन साथीदार ऋषिकेश म्हात्रे व आकाश म्हात्रे यांचा खून होता होता ते सिसिटीव्ही मुळे वाचले. प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव करत सरपंच कुणाल पाटील व त्यांच्या साथीदारांनी स्वतःचा जीव वाचविला. मात्र या सर्व घडामोडी लक्षात घेता महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच खून प्रकरणाची जीवघेणा हल्ल्याची पुनरावृत्ती उरण तालुक्यातील पागोटे गावात झाल्याने सरपंच पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची सुरक्षितता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाचे सरपंचांच्या अशा घटनेकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा पुन्हा असे प्रकार होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेवर आता पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे.
या संदर्भात सरपंच कुणाल पाटील यांच्या जीवितेला धोका निर्माण झाला असून स्वतःच्या सुरक्षेसाठी व हत्त्या करण्यासाठी आलेल्या संबंधित इसमावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना अटक व्हावी या उद्देशाने पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील यांनी पागोटे येथे पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याबाबत माहिती दिली. व ज्या इसमानी, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई करून त्वरित अटक करावी अशी मागणी केली.
यावेळी पत्रकार परिषदेत कुणाल पाटील यांनी सांगितले की “मी कुणाल अरुण पाटील विद्यमान सरपंच असून समाज प्रबोधन, समाजसेवेची सुद्धा कामे करतो. दिनांक ९/१०/२०२४ रोजी कुंडेगाव नवघर रस्त्यावर ऑफिस मध्ये असताना मला ऑफिस बाहेर आरडा ओरड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर काही इसमांनी माझ्यावर व माझ्या दोन साथीदारावर हल्ला केला. व सिसिटीव्ही कॅमेरे बघून आरोपी पळून गेले. प्रसंगावधान राखत आम्ही आमचा प्राण वाचविला. मी सरपंच झाल्याने माझ्या सोबत ग्रामपंचायत निवडणुकीत ज्यांचा हार झाला ते प्रतिस्पर्धी माझ्यावर जळू लागले. मी सरपंच झाल्याने अनेक जण माझ्यावर जळू लागले. माझ्या विरोधात कट कारस्थाने करू लागले.राजकीय द्वेषातून व व्यावसायिक वादातून माझ्यावर हा जीवघेणा हल्ला झाला आहे. मी सिसिटीव्ही फुटेज घेउन सदर इसमा संदर्भात माहिती काढली असता महेश हरिभाऊ पंडित राहणार पागोटे, किरण हरिभाऊ पंडित राहणार पागोटे, किरण हरिभाऊ पंडित राहणार पागोटे, सौरभ दिलीप पाटील राहणार पागोटे, जितेंद्र सदानंद पाटील राहणार पागोटे, सनी कैकाडी राहणार करंजाडे, तालुका पनवेल जिल्हा रायगड, मेघदूत कैकाडी करंजाडे, तालुका पनवेल जिल्हा रायगड व इतर १० ते १२ इसम माझ्यावर हल्ला करायला आले. ज्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला त्याच दिवशी मी उरण पोलीस स्टेशनला संबंधित इसमा विरोधात गुन्हा दाखल करायला गेलो असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून मी उरणच्या न्यायालयात गेलो. न्यायालयाने १९/१२/२०२४ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १७५(३)अन्वये गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले. गुन्हे दाखल करण्याची न्यायालयाने परवानगी दिली. त्यानुसार मी दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी उरण पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध जबाब दिला. मी केलेल्या तक्रारी नुसार, जबाबनुसार जीवघेणा हल्ला करणारे, गुंड प्रवृत्तीचे महेश हरिभाऊ पंडित, किरण हरिभाऊ पंडित, सौरभ दिलीप पाटील, जितेंद्र सदानंद पाटील, सनी कैकाडी, मेघदूत कैकाडी यांच्यावर पोलीस प्रशासनातर्फे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा २०२३ कलम १७५(३)अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १०९, ११८, १२६(२), ३३३, १८९(१), १८९(२), १८९(४), १९०, ६१(२), ३(५), शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,शस्त्र अधिनियम १९५९ कलम २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एवढे मोठे प्रकरण होऊन सुद्धा, आरोपीवर गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत.
सदर आरोपीवर अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नाही. वास्तविक पाहता संबंधित आरोपीना त्वरित शोधून, पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्वरित अटक करायला पाहिजे होते. परंतु त्यांना अद्यापही अटक झालेली नाही. मोकाट फिरणारे आरोपीनी परत माझ्यावर जीवघेणा हल्ला केला किंवा इतर माझ्या साथीदारावर जीवघेणा हल्ला केला केला त्यात कोणाचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण ? गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा आरोपी मोकाट फिरतातच कसे ? ” असा मुद्दा, असा सवाल सरपंच कुणाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी भ्याड हल्ला केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या आरोपीना त्वरित अटक करण्याची मागणी केली. संबंधित आरोपीवर अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल असताना गुंड प्रवृत्तीचे इसम मोकाट फिरत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा धोका आहे. त्यामुळे संबंधित आरोपीना त्वरित अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जनतेने सुद्धा केली आहे.