आरोपी लवकरच होणार गजाआड
कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील चासनळी शिवारामध्ये एका बालकाचा मृतदेह गाठोड्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना शुक्रवार दि २० डिसेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. अखेर चार दिवसांनी गाठोड्यात बांधलेल्या मयत चिमुकल्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील आरोपीही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने त्याचे तपासाचे एक मोठे आव्हान कोपरगाव तालुका पोलिसांसमोर होते होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन चिमुकल्याची ओळख पटवली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला आहे. कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वय वर्ष 4 असे मयत चिमुकल्याचे नाव असून तो साकुरेमिग ता. निफाड जि. नाशिक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मयत कार्तिक बालवाडीत शिक्षण घेत होता व तो हुशार होता कार्तिक हा गेल्या दोन महिन्यापासून त्याच्या आई सोबत राहत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे.मयत कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र कार्तिकचा मृतदेह नदीत कसा आला? नेमकं कोणी गाठोड्यात बांधून मृतदेह नदीत आणून टाकला? कार्तिक आई सोबत राहत असल्याने संशयाची सूयी आई भोवती फिरत असल्याने पोलीस तपासात नेमकं काय ?निष्पन्न होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.