मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल

0

मांढरदेव :  ‘काळूबाईच्या नावाने चांगभलं’च्या जयघोषात मांढरदेव येथील यात्रेला सुरुवात झाली. कडाक्याच्या थंडीत मांढरगडावर मोठ्या संख्येने भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी आणि रोषणाईने सजविण्यात आला आहे.
मांढरदेव (ता. वाई) येथील काळूबाई यात्रा दर वर्षी पौष पौर्णिमेला (शाकंभरी पौर्णिमा) भरते. यात्रेनिमित्त प्रशासनाकडून आज जिल्हा सत्र न्यायाधीश तथा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व्ही आर जोशी, जिल्हा सत्र न्यायाधीश (वाई) आर एन मेहरे व उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, तहसीलदार सोनाली मेटकरी, विश्वस्त ॲड. माणिक माने, अतुल दोशी, सुनील व चंद्रकांत मांढरे, ॲड. पद्माकर पवार, वाईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी सर्व ट्रस्टी, निवासी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे आदींच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. या वेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाकडून देवीची सालंकृत पूजा करण्यात आली. देवीला या वेळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आले. कडाक्याच्या थंडीमुळे मांढरगडावर ‘गार गार वारा’ हे गीत भाविक नाचत मोठ्या उत्साहात गात होते. यात्रेनिमित्त रात्री गडावर देवीचा जागर, गोंधळ झाला. यानंतर देवीची रात्री मांढरदेव गावातून ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. छबिन्यानंतर आज पहाटे पालखी देवीच्या मंदिराजवळ आली. मंदिरालगतच्या पारावर पालखी आल्यानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. एस टी बस, आराम बस, ट्रक, टेम्पो, मोटार, दुचाकीवरून हजारो भाविक यात्रा परिसरात पोहोचले होते. मुखवटे घातलेल्या असंख्य महिला भाविकांनी गर्दी केली होती. पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील मानाची काठी टाळ-मृदंगाच्या गजरात दुपारी मांढरदेवी येथे पोहोचली. सातारा प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. यात्रेपूर्वीच जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही यात्रेचा आढावा घेतला. त्यामुळे यात्रा सुरळीत होण्यास मदत होत आहे.

प्रतिबंधात्मक आदेश

मांढरदेव परिसरामध्ये यात्रा कालावधीमध्ये मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणे, तेल वाहणे, पशुहत्या, तसेच कोंबडी, बकरी, बोकड इत्यादी प्राणी यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यास, वाद्य आणण्यास व वाजविण्यास, झाडांवर खिळे ठोकण्यास, लिंबू टाकणे, काळ्या बाहुल्या, बिबे, भानामती करणे, करणी करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परिसरात मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here