उंब्रज : पाल (ता. कराड) येथे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री खंडोबा व म्हाळसाकांत विवाह सोहळा गोरज मुहर्तावर शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
‘यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट’च्या जयघोषाने पाल नगरी दुमदुमुन गेली. या विवाह सोहळा पार पाडण्यासाठी लाखो भाविक सहभागी झाले होते. महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र राज्यातून आलेल्या भाविकांनी दक्षिण वाळवंटात सकाळच्या जेवणासाठी चुली मांडून स्वयपांकाची तयारी केली होती.
यात्रेच्या मुख्य दिवशी वाळवंटात वाघ्या-मुरळी नाचताना दिसत होत्या. परंपरेनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या स्वःमालकीच्या राजेशाही रथातून मिरवणूकीस प्रारंभ झाला. देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून मिरवणुकीस सुरवात झाली. या सोहळ्यासाठी मानकरी, वऱ्हाडी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती. फुले, तोरणे यांनी सजवलेल्या बैलगाड्यांतून श्री खंडोबाची वऱ्हाडी मंडळी तारळी नदी पात्राकडे जाण्यासाठी निघाली.
प्रत्येक व-हाडी मंडळीच्या पूढे वाद्धयवृंद वाजवत ही मंडळी ‘यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदचा यळकोट’ असा गजर करीत सर्व मानकरी व कारखाना मंदीराकडे ३ वाजण्याच्या दरम्यान रवाना झाले. यावेळी देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्याकडे पुजारी यांनी विधिवत पुजा करुन खंडोबा व म्हाळसा यांच्या मुर्ती दिल्या. यानंतर भव्यदिव्य अशा रथामध्ये विराजमान होत श्री खंडेराया व म्हाळसा यांचे मुखवटे पोटाला बांधून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी मुखवटे घेऊन रथात विराजमान झाले. यावेळी मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वारातून मिरवणूक बाहेर येताच जमलेल्या लाखो भाविकांनी जयघोष करीत भंडारा व खोबर्याची उधळण करीत पाल नगरी दुमदुमुन सोडली.
पाल नगरीवर सोन्याची झळाळी
सर्व मानकरी व कारखाना यांच्यासह शाही मिरवणुक वाळवंटात आली. यावेळी लाखो भाविक या मिरवणूकीत सहभागी झाले. भंडारा व खोबऱ्याची रथावर उधळण करत ‘यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट’ अशा जागर करीत मिरवणुक हळुहळु लग्नं मंडपाकडे रवाना झाली. गोरज मुर्हतावर तिन्ही सांजेच्या आगोदर विवाह मंडपात पोहचली. नंतर बाहूल्यावरती व-हाडी मंडळीचा मानपानाचा विधी उरकण्यात आला. सायंकाळी ५ वाजता ४५ मि. गोरज मुहर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला. भंडाऱ्याच्या उधळीनंतर सारी पाल नगरी जणू सोनेरी झाल्याचे दिसून येत होती. तर सारा परिसर यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट या जयघोषाने दुमदुमुन गेला.
शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, यात्रा कमेटी, देवस्थान ट्रस्ट यांनी यात्रेची तयारी
यावेळी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, यात्रा कमेटी, देवस्थान ट्रस्ट यांनी यात्रेची तयारी चांगल्या पद्धतीने केली असल्याचे दिसुन आले. यात्रेकरुसांठी स्वच्छ पाणी, व मुबलक पाणी स्वच्छतागृहे, आदी सोयी उपलब्ध केल्या होत्या. यात्रेसाठी येणा-या भाविकांसाठी उंब्रज,सातारा, कराड, पाटण येथून एस.टी. महामंडळाने जादा बसची सोय केली होती. तर शिरगाव, हरपळवाडी मार्गावर खाजगी वाहनांच्या पार्किंगची सोय केली होती. प्रशासनाच्यावतीने यात्रा काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखली जावी, यासाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलीस प्रशासनाने आत्पकालीन जलद कृती दल, जमाव नियंत्रण पथक तैनात होते. महत्वाच्या ठिकाणी गर्दीवर नजर ठेवण्यासाठी वॉच टॉवरवरती पोलीस तैनात होते.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेशल कमांडो पथक
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेशल कमांडो पथक तैनात होते. याशिवाय आपत्कालीन दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशामकदलाची पथके, आरोग्यविभाग पथके, रुग्णवाहीका, सज्ज ठेवण्यात आली होती. तर आत्पकालीन उपयोगासाठी पाल-वडगांव-इंदोलीमार्ग पुर्णत: मोकळा ठेवला होता. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षत अमोल ठाकुर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, उंब्रज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे, व कर्मचारी तसेच पोलिस पाटील, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमेटी, स्वयंसेवक यांनी यात्रेचे निटनेटके नियोजन करून यात्रा सुरळीतपणे पार पडली. पत्रकारांना मंदिरात प्रवेश देण्यास अटकाव केला पास आणा अथवा सोडले जाणार नाही अशी भूमिका घेतली.