पुसेगाव : ना पोलिस गाड्यांचा ताफा, ना वाजणारा सायरन, ना कोणता डामडौल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल कुणालाच माहिती न होता मोजक्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी लीन झाले.
अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याने बोललेला नवस फेडून आणि सेवागिरी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्या मार्गी लावण्याचा शब्द देऊन दादा पुढे मार्गस्थ झाले.
विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजितदादांचा एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय व्हावा असा नवस माळेगाव साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण पाटील यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी केला होता. दादा निवडणूकीत एक लाखाहून अधिकच्या मताधिक्याने निवडूनही आले. गेली ४५ वर्षे नेहमी श्री सेवागिरी महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या ढवाण पाटील यांनी बोललेला नवस फेडण्यासाठी काल शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पुसेगावात आले. दादांच्या आजच्या दौऱ्याबाबत ना प्रशासनाला माहिती होती ना पोलिसांना कोणती कल्पना होती. दादांबरोबर पोलिस गाड्यांचा ताफाही नव्हता.
पुसेगावात आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिराला भेट देऊन संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. देवस्थानचे मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, माळेगाव साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन तानाजीराव देवकाते, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, संजय काटे, मंगेश जगताप, पंकज भोसले, देवस्थानचे सचिव विशाल माने व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ यांनी पंढरपूर येथे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे भक्तनिवास बांधण्याची आणि पुसेगाव येथील मंदिराशेजारील घाटावर पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्या मार्गी लावण्याची ग्वाही श्री. पवार यांनी दिली.