राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या गावांचा सन्मान
अहिल्यानगर,:- लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान झालेल्या गावांनी इतर गावांनाही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात १५ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, आकाश दहाडदे आदी उपस्थित होते.
लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देणाऱ्या पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी म्हणाले, नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, त्यांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी, हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे. मतदार यादी सर्वसमावेशक व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. महिला, दिव्यांग, ऊसतोड कामगार आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्याने गेल्या वर्षभरात २ लाख मतदारांची नोंदणी केली असून, यामध्ये ४५ हजारांहून अधिक युवा मतदार आहेत.
विधानसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चार टक्के मतदानवाढ करण्यात यश आले. स्वीप उपक्रमांचे यात मोलाचे योगदान आहे. नागरिक, विविध संस्था, महाविद्यालये आणि शाळांनी सहकार्य केल्याने हे यश संपादन करता आले. यापुढेही सर्वांनी मतदार जागृती उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्याच्या स्वीप उपक्रमात झालेला सन्मान हा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, ग्रामीण भागातील मतदार, मतदार नोंदणी आणि जागृतीत महाविद्यालयांचा सहभाग यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढली. नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत अशाच पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.