राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी शेकडो तरुणांचे पाचारण..
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील मानोरी येथे भर दुपारच्या सुमारास दोन गटांत सिनेस्टाईल लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्यानी तूफान हाणामाऱ्या झाल्याची घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सुरुवातीला राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परिस्थिती गंभीर असल्याकारणाने त्याला अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे समजले आहे.
राहुरी तालुक्यातील मानोरी येथे आज दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान एक अंत्यविधी जात होता. त्यावेळी दोन समाजातील काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला. अंत्यविधी झाल्यानंतर दोन गटांतील अनेक तरुण समोरा समोर आले. त्यावेळी एका गटाने अमजद मेहबूब शेख, वय ३८ वर्षे, रा. मानोरी, या तरुणाला लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यावेळी अमजद शेख या तरुणाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याला राहुरी येथील रुग्णालयात नेण्यात आले.
अमजद शेख हा गंभिर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर अनेक तरुणांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गर्दी केली होती.या घटने नंतर मानोरी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेबाबत रात्री उशिरा राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.