बारामती : बारामतीत अजित पवारांनी चक्क भावकीलाच दम भरला आहे. तालुक्यात सार्वजनिक विकास कामात आमच्याच भावकीतील एकजण पैसे मागत असल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. एका विहिरीमागे ७५ हजार रुपयांची मागणी होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मी तक्रारीची नक्की शहानिशा करेन. जर का पैसे घेत असेल तर त्याचे काही खरे नाही, नसेल घेत तर शुभेच्छा. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे.
सुजय पवार यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचे अजित पवार यांना सांगण्यात आले. त्यावरुन अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमातून संजय पवार यांना इशारा दिला आहे. पंचायत समितीनजीक एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांना होळ येथील दीपक वाघ यांनी एक निवेदन दिले.
त्यामध्ये जिल्हा परिषदेकडून १० लाखांवरील कामांसाठीच्या निविदा मुदत उलटून गेल्यावर उघडली जात आहे. सरपंच व अधिकारी १० टक्के कमिशन घेत कामे मॅनेज करत आहेत. कार्यकारी अभियंता सुजय पवार यांच्यासह अतिरिक्त सीईओ, सहाय्यक लेखाधिकारी, टेंडर क्लार्क यांना कमिशन द्यावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी पाच फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करत असल्याचे म्हटले होते.
दरम्यान अजित पवार यांनी भर कार्यक्रमातच या निवेदनाची दखल घेत म्हणाले, मी एकच बाजू बघणार नाही, तक्रारीची शहानिशा केली जाईल. खरंच असा प्रकार घडत असेल तर कारवाई निश्चित होणार. बारामतीची आदर्श वास्तू म्हणून ‘बारामती पंचायत समिती’कडे पाहिले जाते. या ठिकाणी प्रशासनाकडून काम ही त्याच दर्जाचे व्हावे अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.