कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग दुसर्यांदा विजय मिळवल्यानंतर आ. महेश शिंदे यांनी कोरेगावमधील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सोमवारी (दि. 3) आणि मंगळवारी (दि. 4) शासकीय विश्रामगृहात येथे जनता दरबाराचे आयोजन केले आहे.
या दरबारामध्ये सर्व प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत. कोरेगाव शहरातील नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारास उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार महेशदादा शिंदे विचार मंचच्यावतीने करण्यात आले आहे.
सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता हा जनता दरबार होणार आहे. या जनता दरबारास प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, वनक्षेत्रपाल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, जलसंपदा विभागाचे उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, बीएसएनएलचे उपकार्यकारी अभियंता, एसटीचे आगारप्रमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता, शासकीय, निमशासकीय विभागाचे खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत.