मायणी : ऑनलाइन गेममध्ये हरल्याने आर्थिक नुकसान झाले म्हणून एका तरुणाने चक्क दुचाकी चोरल्याची घटना घडली. याप्रकरणी वडूज पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
शुभम राजू निकम (वय २०, माऊली, ता. खानापूर, सांगली) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिस कर्मचारी प्रदीप भोसले यांनी बनावट ग्राहक म्हणून जुनी दुचाकी खरेदी करणार असल्याचे सांगितले. संशयित तरुणाने त्यांना मायणी येथे बोलावले. त्यानंतर बनपुरी आणि धोंडेवाडी गावाजवळ बोलावले. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले.
त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ऑनलाइन प्रोबो गेम खेळल्याने माझे फार आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे भरपाई करण्यासाठी मायणीतील तुळशीराम शिवाजी कुंभार यांच्या घरासमोरून चोरल्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिस स्टेशनचा अभिलेख पडताळणी केली असता वडूज पोलिस ठाण्यात (एमएच ११ सीएन ५३२२) दुचाकी चोरीला गेल्याची खात्री झाल्याने शुभम निकमला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून आणखी एक दुचाकी असा एकूण एक लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. अधिक तपास पोलिस हवालदार नानासाहेब कारंडे करीत आहेत.