अनिल वीर सातारा : महाराष्ट्र अंनिसच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात रुजवण्यासाठी प्रभावी लोकशिक्षण माध्यम येणार असल्याचे ठरविण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची सहविचार सभा दोन दिवसीय रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली.तेव्हा सर्वानुमते वरील निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यभरातून १७ जिल्ह्यातून १२५ अंनिस कार्यकर्ते व पदाधिकारी, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागांचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते.कामाची दिशा म्हणून महत्त्वाचे सहा ठराव घेण्यात आले.ते पुढीलप्रमाणे आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून व्हावा. म्हणून अंनिसतर्फे ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ स्थापन करून त्याव्दारे विविध ऑनलाईन कोर्सेसचे अभ्यासक्रम उपलब्ध करुन देणे.जादूटोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर व्हावा.यासाठी देशपातळीवर पाठपुरावा करणे.सुशिक्षितांचा अंधश्रध्दा या विषयी प्रबोधन अभियान राबवणे.आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह ,सत्यशोधकी विवाह करू इच्छिणाऱ्यांची माहिती संकलित करून अंनिसच्या राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह वधू वर सूचक मंडळाचे काम सुरू करणे.जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य या विषयी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे.सोशल मिडिया मधून पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि मोबाईलचे व्यसन या विषयी काम करण्यावर भर देणे. मार्च महिन्यात विदर्भात नागपूर येथे राज्यव्यापी, ‘अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद’ घेण्याचे देखील निश्चित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘संघटना बांधणी अभियान’ फेब्रुवारी ते मेपर्यंत राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मध्यवर्तीचे दोन प्रतिनिधी महाराष्ट्रातील अंनिसच्या सर्व शाखांना भेटी देतील.
उद्घाटन प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्ते अभिजीत हेगशेट्ये यांनी केले. अध्यक्षस्थानी नित्यानंद भुते (क्रेडाई, रत्नागिरी) होते. यावेळी रत्नागिरी येथील आरोग्य, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पाच कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. दुपारच्या सत्रात गेल्या सहा महिन्यात अंनिसतर्फे राज्यभरात राबवलेल्या विविध उपक्रम अहवालाचे वाचन राज्य कार्यकारी समिती सदस्य ॲड. मुक्ता दाभोलकर व अण्णा कडलासकर यांनी केले. त्यानंतरच्या दोन सत्रात महाराष्ट्रातील राज्यभरातून आलेल्या जिल्हा कार्याध्यक्षांनी व सचिवांनी आपल्या जिल्ह्याचा कार्य अहवाल राज्य कार्यकारणीसमोर सादर केला.
समितीचा महिला विभाग, प्रकाशन विभाग, संघटना बांधणी आणि प्रशिक्षण विभाग, बुवाबाजी संघर्ष, मानसिक आरोग्य विभाग, विविध उपक्रम विभाग, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह विभाग, सांस्कृतिक विभाग यांच्या कामाचा आढावा आणि पुढील सहा महिन्याचे नियोजन घेण्यात आले.प्रमुख पाहुणे सुहास विद्वांस (मुख्य कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी, रत्नागिरी) यांनी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत होणारे हे कार्यक्रम नेहेमीच भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्याशी निगडित मूल्यांना बढावा देणारे असतात. असे सांगितले. पर्यावरण अभ्यासक डॉ. केतन चौधरी (रत्नागिरी शासकीय फिशरीज कॉलेज) यांनी सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.असे मत व्यक्त केले. माय कोकण या वेब पोर्टलचे प्रवर्तक मुश्ताक खान यांचे देखील समोयोचित भाषण झाले. याकामी,विनोद वायंगणकर, राहुल थोरात, राधा वणजू, वल्लभ वणजू, मधुसूदन तावडे, अतुल तांबट, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, प्रा. प्रवीण देशमुख, सम्राट हटकर यांनी अथक असे परिश्रम घेतले. यावेळी दिपक गिरमे, गणेश चिंचोले डॉ. हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, रामभाऊ डोंगरे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.