बुलडाणा,(प्रतिनिधी )- वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीत येण्याचे तसेच माणसांवर किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण परसले आहे. याच पार्श्वभूमीवर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेत्या फुले,शाहु, आंबेडकरी विचारधारेच्या ॲड.जयश्री शेळके यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा आणि मोताळा तालुक्याला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभलेले आहे. या वनक्षेत्रालगत अनेक गावे आणि वाडी वस्त्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन कामासाठी शेताता जावे लागते. तसेच गावातील गुराख्यांना गुरे चारण्यासाठी जंगलात जावे लागते. अशा वेळी अनेकदा वन्य प्राणी आणि शेतकऱ्यांचा सामना होऊन शेतकरी जखमी झाल्याच्या किंवा त्यांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मागील वर्षी गिरडा येथील सुनिल सुभाष जाधव नामक शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्य झाल्याची घटना घडली होती.
आता काही दिवसांपुर्वी मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार बकऱ्या दगावल्या आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लोकांना आपली दैनंदिन कामे करतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ११ (१) (क) नुसार जे प्राणी मानवी जिवितास धोका ठरले आहेत. किंवा अपंग झालेले आहे किंवा उपचारापलीकडे रोगग्रस्त झालेले आहेत अशाच विशिष्ट प्राण्यांना जेरबंद / बेशुध्दीकरण करण्याची परवानगी देता येते.
परंतु ग्रामीण भागात शेतकरी तसेच इतर नागरिकांचा उदरनिर्वाह त्यांच्याकडे असलेल्या गाय, म्हैस, शेळी यांच्यासारख्या पाळीव प्राण्यांवर आधारित दुग्धव्यवसायावर होत असतो. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा मृत्यु होत नाही. तोपर्यंत अशा वन्यप्राण्यांना जेरबंद केले जात नाही. या तरतुदीमुळे नागरिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगतच्या ज्या गावामध्ये वन्यप्राण्यांची दहशत आहे. जिथे नागरिकांना त्यांचा त्रास होत आहे. अशा ठिकाणी वन विभागाच्या वतीने पिंजरे लावून ठराविक प्राण्यांना जेरबंद करावे. तसेच त्यांना गावापासून दूरवर नैसर्गिक अधिवासात सोडाणे अत्यावश्यक आहे. ज्यामुळे नागरिकांमधील भितीचे वातावरण दूर होईल.
त्यामुळे बुलडाणा तसेच मोताळा तालुक्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावकऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून सुटका मिळावी. यासाठी जनभावनांचा सहानुभूतीवुर्वक विचार करुन बचावात्मक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेत्या ॲड.जयश्री शेळके यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.