भारतीय संत पंरपरेतील भक्ती संप्रदायातील महत्वाचे संत म्हणून संत रोहिदासाची गणना होते.तथागत गौतम बुद्ध यांना संत रोहिदासांनी गुरू मानले होते.हे त्यांच्या दोह्यांमधून आपल्याला समजते.
“अजामिल,गज,गणिका,तारी
काटी कुंजीर पाश
ऐसे गुरमते मुक्त किये तू क्यों न तरे रैदास!”
अर्थ-अजामिल म्हणजे अंगुलीमाल,अंगुलीमालासारख्या हिंस्त्र पशुतुल्य व्यक्तीला मानवी मूल्य आणि जीवनाचे महत्व पटवून देऊन तथागतांनी माणसांत आणले, तसेच पिसाळलेल्या हत्तीला देखील शांत केले,मार्ग दाखवला.गणिका आम्रपालीच्या अंहकाराचे दमन करून तिला बौद्ध संघात प्रवेश दिला.अनेकांना मार्ग दाखवला तर मग हे तथागता आपण रविदासांचे गुरू नाहीत का?
अशा तर्हेने आपल्या स्वरचित दोह्यांमधून तथागत बुद्धांना गुरू मानणार्या संत रोहिदासांच्या विचारांमध्ये तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानाची झलक पाहायला मिळते.
“मन चंगा तो कटौती में गंगा” असे संत रोहिदास सांगतात.आणि नियंत्रित मन हे माणसाची सर्वात मोठी ताकद आहे व स्वतःच्या मनावर,विचारांवर विजय मिळवणार्या व्यक्तीला बाह्य शक्ती हरवू शकत नाहीत हे तत्वज्ञान तथागतांनी सांगितले.
मन चंगा तो कटौती गंगा असे सांगत असताना मनातील विचार शुद्ध,पवित्र आणि सर्व प्राणीमात्रांविषयी दयाभाव दाखवला तर माणसांला काहीच कमी पडत नाही.चांगल्या विचारांचे दान आपण समाजाला दिले तर समाजसुद्धा आपल्याला भरपूर मानसन्मान देतो,असे विचार संत रोहिदासांनी मांडले.
संत रोहिदासांचे विचार आजही आपल्याला गुरूग्ंथसाहिबमध्ये पाहायला मिळतात.
भारतीय समाजव्यवस्था जातपितृसत्तेवर आधारलेली होती,त्याचे दाहक चटके रोहिदासांनी त्यांच्या आयुष्यात भोगले होते.जातीव्यवस्था,विषमता,मानवी मनाचे व्यवस्थापन यांवर संत रोहिदास लिहत गेले,एका अर्थाने तत्कालीन समाजव्यवस्थेवर लेखणीच्या माध्यमातून विद्रोह मांडला.
सध्याच्या घडीला संत रोहिदासांच्या विचारांप्रमाणे निर्मळ मन,निर्मळ विचार ठेवून कर्म चांगले केल्यास वेगळी देवपूजा करण्याची गरज भासेल असे मला तरी वाटत नाही.त्यामुळे मानवी मूल्यांचा आणि मानवी मनाचा विचार केला असता संत रोहिदासांनी मनाची ताकदच आपल्याला पटवून दिल्याचे दिसते.जर का आपण चांगले विचार मनात ठेवून प्रत्येक कार्य केले तर त्या कार्याची फलश्रुती नक्कीच चांगली मिळते. तेव्हा विचार,वाणी,मन आणि आचरण चांगले ठेवण्याचा संकल्प केला तरच संत रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल.
स्वाती लोंढे-चव्हाण
टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर
संकलन : दौड रावणगाव परशुराम निखळे