शिर्डी प्रतिनिधी : रात्री ११ वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहील. याची पुढील चार दिवस शहरातून दवंडी देण्यात येणार आहे.रात्री साडेअकरा वाजता शिर्डी शहरात कोणीही व्यक्ती रस्त्यावर चालताना दिसली, तर त्याची चौकशी करण्यात येईल. त्या व्यक्तीला दवाखाना किंवा अत्यावश्यक ठिकाणी जाण्याचा पुरावा द्यावा लागेल, अशी माहिती माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
शिर्डीत बुधवारी सायंकाळी ग्रामस्थांनी शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, रात्री ११ वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिडौं पूर्णपणे बंद राहील. असे अनेक निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहे.
याचा परिणाम पुढील दहा दिवसात आपल्याला शिर्डी शहरात पहावयास मिळणार आहे. पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. रात्री साडेअकरा वाजता हॉटेल बंदचा निर्णय हा ग्रामसभेत झाला आहे. बाहेरच्या माणसाने शिर्डी ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन सल्ला देण्याची आवश्यकता नाही. त्यांचे काहीही ऐकले जाणार नाही. प्रसादालयाबाबत मी जेव्हा बोललो तेव्हा महाराष्ट्रात माझे हसू करण्यात आले. माझ्यावर टीका टिप्पणी करण्यात आली.आपण दर्शन रांगेतून बाहेर येणाऱ्यांना भोजन प्रसादाचा पास द्यायला लागल्यामुळे रोजचे १० हजार लोक जेवायचे कमी झाले.
त्या ठिकाणी अजून काही सुधारणा करण्याचा आमचा मानस की साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा.हे भोजनालय नव्हे प्रसादालय आहे.त्यामुळे प्रसाद हा भक्तांनाच मिळण्याचा अधिकार असतो इतरांना नाही. शिर्डीच्या सुरक्षेची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आहे.मी प्रसादालयाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल स्थानिकांनी माझ्या विरोधात एकही शब्द काढला नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणतो महाराष्ट्र माझ्याबद्दल काय विचार करतो, यापेक्षा मी ज्या लोकांच्या जीवावर आज एवढा मोठा झालो ते लोक माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.