शेगाव : बुलडाण्यातल्या शेगावमध्ये आज (शुक्रवार) राहुल गांधी यांची सभा झाली. यासभेत राहुल गांधी सावरकरांच्या मुद्द्यावर पुन्हा बोलतील अशी शक्यता होती. पण यावेळी त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीवर मी पुढे चालत असल्याचं यावेळा राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांच्या सभे मनसेनं विरोध केला होता. पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी आधीच धरपकड केली. “या यात्रेचं उद्दिष्ट तुमचा आवाज ऐकणं आहे, तुमचं दुःख समजणं हा आहे. भय ऐकून घेतल्यावर संपतं. गळाभेट घेतल्यावर संपतं,” असं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलंय. भाजप लोकांमध्ये भांडणं लावत असल्याचा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केलाय.
“महाराष्ट्रातल्या सर्व महापुरुषांनी लोकांना जोडण्याचं काम केलं आहे. आमची भारत जोडो यात्रासुद्धा तेच करत आहे,” अंस राहुल गांधी यांनी म्हटलंय.
“शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला रस्ता दाखवला, ही त्यांची जमीन आहे. आई मुलाला रस्ता दाखवते. शिवाजी महाराजांना त्यांच्या आई जिजाऊंनी घडलं, जे काम जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी केलं तेच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं राहुल गांधी पुढे म्हणालेत.
या सभेमध्ये सावरकरांच्या मुद्द्यावर बोलणं मात्र राहुल गांधी यांनी टाळलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज शेगावमध्ये दाखल झाली, तेव्हा गांधींनी गजाजन महाराजांचं दर्शन घेतलं. यावळी त्यांनी इतर काँग्रेस नेत्यांबरोबर प्रसादही घेतला. त्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती.
मनसेचं आंदोलन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शेगावमध्ये दाखल झाले होते .मात्र शेगावला जाण्यापूर्वीच या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं.
बुलढाण्यातील चिखली येथे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना रोखण्यात आल्या नंतर मनसैनिकांनी आंदोलन केले. राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देऊन त्यांनी कारवाईचा निषेध केला. शेगावला जाण्यापूर्वीच रोखल्यामुळे मनसेच्या नेत्यांनी ही दडपशाही असल्याचा आरोप केला. पोलिसांनी संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतलं. विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांना घाबरूनच माफी मागितली होती, असं राहुल गांधी म्हणाले होते. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानेही राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं. याबाबत विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.