नथ प्रशिक्षण महिलांसाठी आर्थिकवृद्धीचा मार्ग- सौ. पुष्पाताई काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- असे कोणतेही क्षेत्र नाही की, त्या क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले नाही. त्यामुळे महिलांचा मान सन्मान केवळ महिला दिनापूरताच मर्यादित नसावा तर पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे. महिलाच महिलांच्या मदतीला येवून त्यांना सर्वच बाबतीत समृद्ध करू शकतात ह्या दूरदृष्टीतून काही वर्षापूर्वी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने बचत गटाच्या महिलांना मुंबई येथे दागिने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. आज रोजी त्या महिलांचा दागिने तयार करण्याच्या व्यवसायात चांगलाच जम बसला असून त्यांना मोठ्या प्रमाणात दागिने तयार करण्याच्या ऑर्डर मिळत असून या महिला आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महिलांना नथ तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण महिलांसाठी आर्थिक वृद्धीचा मार्ग ठरेल असा विश्वास प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा व गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांनी व्यक्त केला.

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती महिला अकॅडमी तसेच आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार (दि.०९) रोजी कृष्णाई मंगल कार्यालयात महिलांच्या  आवडीचा दागिना असलेल्या नथीचे महिला व मुलींसाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, महिलांना त्यांच्या कला आणि कौशल्यांच्या विकासासाठी एक नवा दृषटिकोन मिळावा आणि त्यातून त्यांचे आर्थिक हित साधले जावे यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ सातत्याने नवनवीन उपक्रम राबवीत असते नथ प्रशिक्षण कार्यशाळा हा त्याचाच एक भाग आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना जेवढ्या नथीच्या ऑर्डर येतील तेवढ्या ऑर्डर महिलांनी पूर्ण कराव्यात व आपली आर्थिक वृद्धी साधावी. आपण एकमेकीना सहकार्य करून पुढे जावू. तुमचे कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली मदत करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास सौ.पुष्पाताई काळे यांनी उपस्थित महिलांना यावेळी दिला.

नथ तयार करण्याचे मार्गदर्शन करतांना सौ.नीलम गावित्रे यांनी उपस्थित महिला व मुलींना नथ डिजाइन आणि त्यांचं महत्त्व, तसेच नथ कशी बनवायची याबद्दल सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘नथ हा एक पारंपारिक दागिना असला तरी त्यात विविधता आणि शैलीची भर आहे. आजकाल नथीकडे फॅशन म्हणूनही पाहिलं जातं, त्यामुळे त्याला वेगवेगळ्या शैलीत तयार करणं आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांनी नथ तयार करण्याची कला सहजपणे आत्मसात केली. यामध्ये मोत्यांचे, चांदीचे आणि विविध रत्नांचे वापर करून नथ सजवण्याच्या तंत्रांची माहिती देवून महिलांना स्वतःच्या कल्पकतेला महत्त्व देण्यावर भर दिला आणि नथ सजवताना कशा प्रकारे सृजनशीलतेचा वापर करावा यावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत काही विशेष तंत्र शिकवण्यात आली, त्यामुळे उपस्थित महिला व मुलींना आपली स्वतःची नथ बनवण्यासाठी प्रेरणा मिळाली. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी महिलांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी ‘चला देश घडवू या, बालविवाह थांबवू या’ या सामाजिक विषयावर सामजिक कार्यकर्ते तथा शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक गावित्रे यांनी बालविवाह बाबत समुपदेशन करून बालविवाह मुक्त महाराष्ट्रसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यावेळी उपस्थित महिला भगिनींनी ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र’ यासाठी सर्वांनी शपथ घेतली.यावेळी नथ प्रशिक्षिका सौ. निलम गावित्रे, सौ. शितल देशमुख, मयुरी डूबे, चंद्रकांत बागुल, राजश्री बागुल, जयश्री बोरावके, छबुताई भातकुटे, डॉ.वर्षा झवर, मिरा साळवे, लक्ष्मीताई हलवाई, गायत्री हलवाई आदींसह प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या, नवक्रांती महिला अकॅडमी सदस्या तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

            या नथ प्रशिक्षण कार्यशाळेने पारंपारिक नथ तयार करण्याच्या कलेला आधुनिक दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी आणि त्यावर प्रयोग करण्यासाठी महिलांना उत्तम संधी दिली. त्याच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास आणि सृजनशीलता वाढली आहे. ही कार्यशाळा आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरली असून आम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्यामुळे स्वतः नथ डिझाइन करण्याची आवड अधिक पटीने वाढली असल्याचे उपस्थित महिलांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here