सातारा प्रतिनिधी : सातारा शहरासह सातारा जिल्ह्यातील पाचवड आणि शेंद्रे गावच्या परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सगळ्यांच्याच कानावर पडली. सर्वांनाच त्याची हळहळ वाटत होती. मात्र यामागे तेच तेच कारण पुढे येत आहे. त्यामुळे जुनीच गाऱ्हानी आणि त्यांची नवी कहाणी घेऊन हा रविवार आला . सातारा जिल्ह्यातील पाचवड परिसरात एका इनोव्हा कारने थांबलेल्या ट्रकला धडक मारल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू घडल्याची बातमी आपण सर्वांनी वाचली असेल अथवा ऐकली असेल पण या अपघाताचं कारण काय? असाच अपघात सातारा शहरातील बस डेपो समोर झाला यामध्ये ओव्हरटेक करताना दुचाकी वाहनाला धडक लागल्याने एकाचा मृत्यू झाला
या अपघाताला अपघात ग्रस्त स्वतःच जबाबदार आहेत असे सर्वांना वाटते. असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु या अपघातामुळे साताऱ्यातील प्रशासनाला उघडे केले आहे. जास्त रहदारी असल्याने सातारा बस डेपो समोरील अनेक वळणे बंद करण्यात आली आहेत. या बंद वळणांमुळे या परिसरात अपघात होत होते असे वाहतूक पोलिसांना वाटते. पण रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमणांमुळे आणि पदपथावर असणाऱ्या अतिक्रमणांमुळे आणि रिक्षा चालकांच्या बेशिस्तीमुळे रस्ता अरुंद होत आहे. प्रशासन कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही या मागचे कारण स्थानिक राजकारण आणि निवडणुकीचे समीकरण असे आहे. अरुंद रस्ता असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. रविवारी झालेल्या अपघातात ओव्हरटेक करणे भोवले असले तरी शहरातील प्रमुख रहदारीच्या ठिकाणी कृत्रिम अरुंद रस्ता हे प्रमुख कारण समोर येत आहे.
अपघाताच्या दिवशी रस्त्याची दुतर्फा बाजू पाहिल्यास बेशिस्तपणे रिक्षा थांबवून प्रवासी वाहतूक सुरू होती. त्याचप्रमाणे पदपथावर अतिक्रमण झाल्याने मोठ्या प्रमाणात पदाचारी रस्त्यावरून येजा करत होते. त्यामुळे कृत्रिम अरुंद रस्ता झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच दूचाकी स्वाराने ओव्हरटेक केल्याने हा अपघात घडला. रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. अवजड वाहनांची वाहतूक बस स्थानकावरून निघणाऱ्या बसेसला बाहेर निघण्यासाठी पर्याय मार्गाची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे.
बेशिस्त रिक्षा चालकांना पोलिसांकडून तंबी देण्यात यावी. पदपथावरील अतिक्रमणे काढण्यात यावी.सेव्हन स्टार या इमारतीमध्ये मोफत पार्किंगची सुविधा करण्यात यावी. बस स्थानकातून ये जा करणाऱ्या बसेस अवजड वाहने आणि रिक्षा रस्त्यावर पदाचारी यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे साताऱ्यातील सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पार्किंगचा अनेक जण शासकीय जागेत खाजगी बेकायदेशीर पार्किंगचा व्यवसाय करून लखपती झाले आहेत. या लखपतींना नेमकी कोणाची मदत होते हे सर्वांना माहीत आहे. पाचवड येथे थांबलेल्या ट्रकला इनोवा या वाहनाने धडक दिली. त्यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक नादुरुस्त होता. नादुरुस्त ट्रक किती दिवसांपासून महामार्गावर बंद अवस्थेत उभा होता. महामार्गावर वाहतूक बाधा होईल अशा अवस्थेत असणारा ट्रक महामार्गावरून का हलविण्यात आला नाही? बंद अवस्थेत असणाऱ्या ट्रक बाबत टोलनाका कर्मचारी अधिकारी यांनी काय केले? नादुरुस्त ट्रक महामार्गावर उभा असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी काय केले? महामार्ग वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती घेऊन सूचनात्मक उपाययोजना राबवल्या होत्या का? जर नादुरुस्त ट्रक महामार्गावर उभा आहे तर त्या ठिकाणी बॅरिकेट्स का लावण्यात आले नाहीत? आणि तिसरा अपघात शेंद्रे गावच्या परिसरात दुचाकीला ट्रक ने धडक दिल्याने अपघातात एकाचा मृत्यू झाला.
बंद नादुरुस्त ट्रक महामार्गावर असूनही उपाययोजना का राबवल्या नाहीत? याची चौकशी वरिष्ठ महामार्ग वाहतूक पोलीस अधिकारी करणार का? टोलनाक्यावर कारवाई केली जाणार का? कर्तव्यार्थ असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार का?
पोलीस प्रशासनाने बेशिस्त पणाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर बस स्थानक परिसरात कारवाई का केली नाही? याची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार का? नगरपरिषद सातारा तर्फे आज अखेर परिसरातील अतिक्रमणांवर अतिक्रमण विभागाने का कारवाई केली नाही? याची चौकशी वरिष्ठ नगरपरिषद अधिकारी करणार का? असा सवाल नागरिक करत आहे