देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
एक महिला उभी राहिली तर एक घर उभे राहू शकते आणि एक एक घर उभे राहिले तर आख्खे शहर सक्षमपणे उभे राहू शकते, त्यामुळे महिला बचत गटातील सदस्यांनी स्वतःचे व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी व्यक्त केले. देवळाली प्रवरानगर परिषदेच्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, सिटी कॉर्डिनेटर उदय इंगळे, लेखाधिकारी स्वप्नील फड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना नवाळे म्हणाले की, कुटुंब व्यवस्थेचा कणा महिलांच्या हातात असून महिलांनी सक्षमपणे काम केल्यास कुटुंब व्यवस्थित उभे राहू शकते, नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय उभा करणे आवश्यक आहे. यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल.असे नवाळे यांनी सांगितले. सिटी कॉर्डिनेटर उदय इंगळे यांनी शहर स्वच्छता अभियान बाबतची माहिती दिली तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी बचत गटा ची संकल्पना स्पष्ट करून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमास देवळाली प्रवरा शहरातील 125 बचत गटातील महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या. महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी समर्पक उत्तरे देऊन माहिती दिली. समुदाय संघटिका सविता हारदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी खरात यांनी केले तर शेवटी कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती गडाख, वनिता वाणी, अनिता नन्नवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.