प्राचीन भारतात होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. वसंत ऋतुच्या आगमनाप्रसंगी निसर्गाने अधिकच साजश्रृंगार केलेला असतो. फुललेल्या फुलाला कोमलतेचा बहार आलेला असतो. झाडं पाना-फुलांनी नववधुगत बावरुन गेलेली असतात आणि पक्षाचं आकाशात झुलायचं स्वप्नही साकार झालेलं असतं. निसर्गाच्या तारुण्याचे हिरवेपण पाहून माणसाचं मन बहरुन आनंदून आलेलं असतं. वसंतोत्सव हा कालांतराने होळी दहनाच्या रुपाने साजरा होऊ लागला. उत्सवाचं स्वरुप जरी बदललं तरी उद्देश धोरण तोच आहे. प्रसन्नता, आनंद, मस्ती या दिवसात मन उचंबळून आलेलं असतं. लहान मुलांना पीडा देणाऱ्या ‘होलिका’, ‘ढुंढा’, ‘पुतना’ ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. अशाप्रकारे हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटावर चांगल्याचा विजयाचे चांगले प्रतीक आहे. कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. वाईट गोष्टींवर विजय मिळवणे ही या सणाची व्याख्या आहे. या प्रकारे होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते.
होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते. हे वसंत ऋतु कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आवाहन आहे. हे एक रात्र आणि एक दिवस चालते, हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी (पौर्णिमेचा दिवस) चालू होतो, जो इंग्रजीब ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात. या उत्सवाला ‘होलिकादहन’ किंवा ‘होळी पौर्णिमा’, ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’, फाग, फागुन ‘दोलायात्रा’, ‘कामदहन’ अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत, ज्याला कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला ‘फाल्गुनोत्सव’ आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त ‘वसंतागमनोत्सव’ किंवा ‘वसंतोत्सव’ असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणालाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.
भारताचा सांस्कृतिक सण म्हणजे होळी ! अंतःकरणातील अपार प्रेमाने रंग गुलालाची उघळण करणारा. रंगोन्मादानं भारतीय मातीत अंर्तबाहय मस्ती भरणारा. प्रांत, भाषा व धर्माच्या विभिन्न रंगांच्या सरितांना राष्ट्रीय रंगस्थळीच्या त्रिवेणीत एकात्मतेच्या रंगानं प्रवाहित करणारा हा राष्ट्रीय सण. होळी-धुळीवंदन सणाला महाराष्ट्रात धामधुम, युवकांचा जल्लोष, मादक द्रव्यांचा सर्रास वापर व आहारी जात या सणाची सणसण समाजात पसरवितांना दिसतात. होळीच्या दिवशी राजा आणि प्रजा एक होऊन एकमेकांवर रंग उडवितात ते काय निदान वर्षाचे चार-पाच दिवस तरी समानतेचे तत्व अनुभवण्यासाठी? मानवी आरोग्यावर होणारे ऋतुचे परिणाम याचा संकेत देणारा सण आहे, निसर्ग आनंदाचा सण आहे. होळीमध्ये एकमेकांना विविध रंग लावून हा सण साजरा करतात. तसेच विविध पारंपरिक गाणी, पारंपरिक नृत्ये यामध्ये समाविष्ट असतात. बंजारा समाजामध्ये होळीला फार महत्त्व आहे. बंजारा समाजामध्ये, बंजारा भगिनी पारंपरिक पोशाखात नृत्य करतात. विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.
भारताच्या निरनिराळया राज्यात निरनिराळया प्रकारे होळी करतांना दिसतात. परंतू होळी पेटविण्याचा प्रकार सर्वच ठिकाणी सारखाच होत असतो. महाराष्ट्रात शेणाच्या गोवऱ्यांची किंवा लाकडांची होळी करण्याची प्रथा आहे. कोकणपट्टीत सुपारीचे झाड, आंब्याचे किंवा इतर कुठल्याही झाडांचा सोट देवळापूढे रोवून त्यांच्या तळाशी लहान-लहान लाकडे व गवत जाळतात. इतर प्रदेशाच्या मानाने महाराष्ट्रातील कोकणपट्टीत या सणाला बरेच महत्व आहे. गोव्यात काही ठिकाणी वायंगणी शिमगा म्हणजे चैत्र शुक्ल पक्षात देखील घुमट (मडक्याचे वाद्य) वाजविले जावून जल्लोशात होळी सण साजरा करतांना आढळतात. होळी हा रंगाचा आणि कृषी संस्कृतीचे जतन करणारा सण आहे. शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. यादिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. आदिवासी जमातीतील स्त्री-पुरुष हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असतांना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होऊन विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करतात.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला ‘धुळवड’ असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. होळी हा रंगाचा सण आहे, समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो. होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे. नागपूरकर भोसल्यांच्या वाड्यात व तसेच पेशवाईत खेळली जाणारी होळी आणि रंगपंचमी तर महाराष्ट्राच्या इतिहासात सुप्रसिध्दच आहे. स्वतंत्र भारतात होळीची प्रथा पंडित जवाहरलाल नेहरुंजी पण जोपासली, जपली ! प्रेम आणि आनंद पसरवणे आपण या सणाचा स्वीकार करत असताना, या मनःपूर्वक शुभेच्छांसह प्रेम आणि आनंद पसरवू या. या प्रसंगी सर्वांना सुरक्षित होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रविण बागडे
नागपूर .भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com