अनिल वीर सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवार दि.१४ एप्रिल २०२५ पासून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.तेव्हा नवी मुंबई येथे जयंती महोत्सव समितीतर्फे आगळ्या वेगळ्या व प्रदूषणमुक्त भीमजयंत्तीचे आयोजन केले आहे.तो पॅटर्न सर्वत्र राबवणे गरजेचे आहे.
“बदलाव घडवून आणायचा असेल तर समाजाने एकत्र येण्याची काळाची गरज आहे.”
पी. ई. एस. शाळा, सीबीडी बेलापूर येथे झालेल्या बैठकीत अखिल नवी मुंबई संयुक्त नागरी जयंती महोत्सव समितीच्या पुढाकाराने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी यंदा नवी मुंबई विभागात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने संयुक्तरित्या १३४ वी भीम जयंती साजरी करण्याचे ठरले. पूज्य भदंत विमलकित्ती गुणसिरीजी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या जयंती पर्वाचे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे असणार आहे.
सोमवार दि.१४ रोजी संध्याकाळी ४ वाजता मिरवणूक प्रारंभ पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे (पी. ई. एस. चे) सेंट्रल स्कूल, सेक्टर -१, पोलिस कॉलनी जवळ, सीबीडी बेलापूर येथून होणार आहे.मिरवणुक विसर्जन व त्यानंतर जाहीर सभा पी. ई. एस. चे डी.एड. कॉलेज, सेक्टर ८ बी, राजीव गांधी स्टेडियमच्या मागे, सीबीडी बेलापूर येथे होणार आहे.
बाबासाहेबांची जयंती म्हणजे समग्र आंबेडकरी समाजाचे ऐक्य प्रकट करण्याचा एक सुवर्ण दिवस असतो.तेव्हा नवी मुंबईतील समस्त बौद्धजणांनी एकत्र येऊन राष्ट्रनिर्माते प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत व अपेक्षित असलेल्या समाजाचे ऐक्य दाखविणे कधी नव्हे तेवढी आजच्या काळाची गरज आहे. आपापल्या कॉलनीत/वस्त्यांमध्ये वेगवेगळी जयंती साजरी न करता सर्वांनी एकत्र येऊन शिस्तबद्ध व शांतपणे मिरवणूक काढणे. त्यानंतर महापुरुष/महामाता यांनी समाज व देशासाठी केलेल्या महान कार्यांचे स्मरण करून त्यांचे प्रेरणादायी विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सभेचे आयोजन करणे. बोधिसत्वाची १३४ वी जयंती पारंपरिक पद्धतीपेक्षा नाविन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून एक नवा आदर्श स्थापित करण्याचा समितीचा मानस व प्रयत्न आहे.नवी मुंबईतील विभिन्न मंडळांमध्ये ऐक्य व सामंजस्य निर्माण करण्यासाठीचा हा एक सार्थक व प्रामाणिक प्रयत्न आहे.याचे दूरगामी परिणाम निश्चितच सकारात्मक होणार आहेत.
मिरवणुकीत भगवान बुद्ध, बाबासाहेब यांच्या प्रतिमेसह भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिकृती यांना क्रमशः दोन सुशोभित रथात ठेऊन ४-४ जणांच्या टीमने आळीपाळीने दोरखंडाद्वारे पुढे पुढे ओढायचे आहे. याद्वारे सहभागी होणारा प्रत्येक जण बाबासाहेबांप्रती आदर प्रकट करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन नेण्याची बांधिलकी प्रदर्शित करणार आहे.फटाके न फोडणे. माती, वायु व आवाजाचे प्रदूषण टाळणे/पर्यावरणाचे रक्षण करणे.बॅंडबाजा/डीजे/ढोल- ताशा इत्यादींचा वापर न करता ध्वनिप्रदूषण टाळणे.फुले, हार व गुलाल/रंग इत्यादी वस्तूंचा वापर टाळणे.. पारंपारिक पद्धतीने स्वागत समारंभ न करता महापुरुषांचे एक पुस्तक व पांढरा शुभ्र रुमाल भेटवरूपाने देणे आणि हात जोडून अभिवादन करणे.
पारंपारिक घोषणा देण्याऐवजी बाबासाहेबांचे आदर्श सुविचार/शिकवण तसेच भारतीय संविधानातील मूलभूत तत्वे ज्याद्वारे लोकांपर्यंत पोहचतील अशा घोषणा देणे. मिरवणुकीमध्ये वेगवेगळे विभाग बनवून सामाजिक संदेश देणे. शाळकरी मुलामुलींचे/महिलांचे लेझीम पथकाची सोया करणे.स्वसरंक्षणार्थ मार्शल आर्ट/दांडपट्टा आदीचे चलित प्रदर्शन/पथक.संतांचे सुविचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी टाळ मृदुंग पथक यांची सोया करणे.वेगवेगळे फलक/प्लेकार्डसद्वारे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या संविधानिक मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे. महिला व कामगारांचे अधिकार, जातीयता/विषमता नष्ट करण्याचे कार्य, मूलभूत अधिकार तसेच कर्तव्य इत्यादींचे संदेश प्रदर्शित करणे.जयंतीला उपस्थित सर्व जण (स्त्री व पुरुष दोन्ही) वेगवेगळ्या रंगाचे फेटे परिधान करतील. उद्धेश हा की, एका विशिष्ट् पद्धतीच्या रंगाचे प्रदर्शन केल्यामुळे समाजा-समाजामध्ये रंगांचे झालेले वाटप व त्यातून उत्पन्न होणारी द्वेषाची भावना याला आळा बसेल. कारण, कोणत्याही रंगावर कोण्या एका विशिष्ट जाती किंवा धर्माचा मालकी हक्क नाही. वेगवेगळ्या रंगाचे फेटे परिधान केल्यामुळे मैत्री व बंधुभाव वृद्धिंगत होऊन शांततापूर्ण सहजीवनाचे (peaceful coexistence) वातावरण निर्माण होण्यास मदत मिळेल.
जाहीर सभा : वेगवेगळ्या समाजातील व धर्मातील विद्वान व प्रभावी वक्त्यांना आमंत्रित करून बाबासाहेब तसेच भारतीय संविधान या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन. करणे. सभेनंतर सर्व उपस्थितांकरिता स्वल्पोहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे.मिरवणुकीसाठी उपयुक्त ड्रेस कोड असावा.तेव्हा नवी मुंबईतील सर्व संस्था/विहारे/समित्या यांना जयंतीच्या या नियोजित भव्य दिव्य अशा कार्यक्रमात परिवारासहसह सहभागी होऊन समाजाच्या एकतेचे दर्शन घडवून राष्ट्रनिर्मात्याला विनम्र अभिवादन करू या.असं आवाहन अखिल नवी मुंबई संयुक्त नागरी जयंती महोत्सव समितीने केले आहे.