सातारा : असंसर्गजन्य आजार अंतर्गत आजारांची नेंशनल एनसीडी पोर्टलवरच्या आकडेवाडीमध्ये तपासणी, निदान हे निकष लावून प्राप्त गुणानुसार उत्तम कामगिरी करणारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास राज्यात प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
त्याचप्रमाणे कुष्ठरोग निर्मुलनात सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. जागतिक आरोग्य दिनी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.
आरोग्य विभाग महाराष्ट्र शासना मार्फत श्री यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागातील उत्तम कामगिरी करणारे जिल्हे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रत उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, कुटुंब नियोजन कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणारी रुग्णालये, जास्त प्रसूती करणाऱ्या आरोग्य संस्था, आरबीएसके पथकातील उत्तम कामगिरी करणारे जिल्हा, असंसर्गजन्य आजारांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, सिकल सेलमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, उत्तम कामगिरी करणारे एसएनसीयू , उत्तम कामगिरी करणारे आयसीयू तसेच गुणवत्ता आश्वासन कार्यक्रकांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था यांना स्कृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या मार्गदर्शनात असंसर्गजन्य आजार अंतर्गत आजारांची नेंशनल एनसीडी पोर्टलवरच्या आकडेवाडीमध्ये तपासणी, निदान हे निकष लावून प्राप्त गुणानुसार उत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून आरोग्य विभाग, जिल्हा परिषद साताराचा गौरव झाला आहे. कुष्ठरोग निर्मुल कार्यक्रमात नविन कुष्ठ रुग्ण शोधणे, विकृती रुग्ण शोधणे, बालरुग्ण प्रमाण, एम. बी. रुग्ण प्रमाण, स्त्री रुग्ण प्रमाण, एलसीडीसी मोहिमेत शोधलेले नविन कुष्ठरुग्ण या निकषानुसार सह संचालक, कुष्ठरोग विभाग सातारा यांना महाराष्ट्र राज्यात द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते असंसर्गजन्य आजार अंतर्गत कामगिरीबद्दल अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील, डीपीसी डॉ. गितांजली टकले, दिव्या परदेशी यांचा तर कुष्ठरोग विभाग मार्फत् पुरस्कारासाठी सहाय्यक संचालक डॉ राजेश गायकवाड व कर्मचाऱ्यांनी पुरस्कार स्विकारला.