नवी दिल्ली : 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात भारतीय तपास यंत्रणेना यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना त्याचं भारतात प्रत्यार्पण केलं जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. या घोषनेनंतर तहव्वूर राणाने अमेरिकन न्यायालयांमध्ये प्रत्यार्पण रोखण्यासाठीचे प्रयत्न केले होते; मात्र, ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर आता राणाला भारतात आणलं जात आहे.
फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना ट्रम्प म्हणाले होते की, “मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असेलल्या राणाला भारतात कायदेशीर गोष्टींचा सामना करावा लागेल.” भारत अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे.
2008 च्या मुंबई हल्ल्यातील सहभागाप्रकरणी तहव्वूर हुसैन राणा अमेरिकेत शिक्षा भोगत आहे. मे 2023 मध्ये तहव्वूर हुसैन राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेतील कोर्टानं मंजुरी दिली होती. मात्र, या निर्णयाला त्यानं अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली होती. यानंतर तहव्वूर हुसैन राणा याला भारतात आणलं जाईल, याबाबतचे कयास मांडले जात होते.
तहव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानात झाला. पण तो कॅनडाचा नागरिक आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने अमेरिकेला विनंती केली होती.तहव्वूर राणा हा त्याचा मित्र डेव्हिड हेडली याच्यासह डेन्मार्कमध्ये मुंबईवर हल्ला घडवून आणण्याच्या आणि हल्ल्याची योजना आखल्याच्या आरोपाखाली 2013 मध्ये दोषी आढळला होता. अमेरिकन कोर्टाने त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक इमारतींवर एकाच वेळी हल्ला केला होता. या हल्ल्यात 164 जणांचा मृत्यू झाला होता. या कारवाईत 9 दहशतवादीही ठार झाले. हे दहशतवादी पाकिस्तानच्या भूमीवर कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा भारताचा आरोप आहे. या हल्ल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं गेलं, त्याला नोव्हेंबर 2012 मध्ये फाशी देण्यात आली.
दुसरीकडे, पाकिस्तानी-अमेरिकन नागरिक असलेल्या डेव्हिड हेडलीविरोधात भारतीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या तपासात एक नाव वारंवार समोर येत होतं आणि ते नाव होतं – तहव्वूर हुसैन राणा. शिकागो येथे कडेकोट बंदोबस्तात चार आठवडे चाललेल्या खटल्यादरम्यान राणाबाबतचे अनेक तपशील समोर आले. यादरम्यान त्याच्या बालपणीचा जवळचा मित्र हेडलीची पार्श्वभूमीही समोर आली. पण या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेडली तहव्वूर राणाविरुद्ध सरकारी साक्षीदार झाला. हेडलीने मुंबई हल्ल्याच्या नियोजनाबाबत तपशीलवार साक्ष दिली. तसंच, त्याची आणि राणाचा सहभाग नेमका किती होता, हेही स्पष्ट केलं.
तहव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानात झाला आणि तिथंच तो लहानाचा मोठा झाला. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काम करू लागला. राणाची पत्नीही डॉक्टर होती. पती-पत्नी दोघेही 1997 मध्ये कॅनडात गेले आणि 2001 मध्ये कॅनडाचे नागरिक बनले. 2009 मध्ये अटक होण्यापूर्वी काही वर्षे राणाने अमेरिकेतील शिकागो इथं इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली होती. तसंच, इतर काही व्यवसायही सुरू केले. डेव्हिड हेडली तसा राणाचा जुना मित्र. पण शिकागोत पुन्हा भेट झाली आणि आधीची मैत्री पुन्हा सुरू झाली.
शिकागो विमानतळावरून जेरबंद
FBI या अमेरिकन तपास यंत्रणेनं ऑक्टोबर 2009 मध्ये तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांना शिकागो विमानतळावर पकडलं होतं. Jyllands-Posten नावाच्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी हे दोघे डेन्मार्कला जाणारं विमान पकडण्यासाठी जात होते, असा एफबीआयचा दावा आहे. Jyllands-Posten या वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांचं वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं.या दोघांच्या चौकशीदरम्यान मुंबई हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याची पहिल्यांदा माहिती समोर आली.