संगमनेर : तालुक्यातील घुलेवाडी गटाचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांची दोन महिलांसह अन्य दोघांनी त्यांच्याच घुलेवाडी गावात ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयासमोर जोरदार शिवीगाळ करत धुलाई केल्याची घटना काल सकाळी साडे आकरा वाजता घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घुलेवाडी येथील कविता सुरेश अभंग व जिल्हा परिषद सदस्य सिताराम पुंजा राऊत यांच्यामध्ये सामुदायिक रस्त्यावरून नेहमीच वाद होत असतो. दि. १३ सप्टेंबर रोजी या दोन कुटुंबामध्ये वाद झाले होते. त्यावेळी त्यांनी एकमेकांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. काल सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सिताराम राऊत हे घुलेवाडी गावच्या पूर्वेला असणाऱ्या तलाठी कार्यालयात कामानिमित्त त्यांच्या कारमधून नं. एम.एच.१७ बी एक्स - ०६४३ ने गेले होते. या ठिकाणी त्यांचे मित्र भेटल्याने त्यांनी आपले वाहन थांबवले व मित्रांसोबत चर्चा झाल्यानंतर थोडे पुढे गेले असता कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग प्रथमेश संतोष अभंग, (सर्व राहणार घुलेवाडी) भारत संभाजी भोसले (कोंची ता. संगमनेर) हे त्यांच्या वाहनांमधून आले आणि त्यांनी राऊत यांच्या गाडीला गाडी आडवी लावली व ते सर्वजन खाली उतरले. कविता संतोष अभंग व विद्या संतोष अभंग या दोघींनी सिताराम राऊत यांना गचांडी धरून गाडीतून खाली ओढले. कविता अभंग व विद्या अभंग यांनी राऊत यांना खाली पाडून शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विद्या अभंग हिने सिताराम राऊत यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन काढून घेतली आणि राऊत यांना दगड फेकून मारून जखमी केले. तसेच राऊत यांच्या वाहनाचे नुकसान केले. यावेळी प्रथमेश अभंग व भारत भोसले हे सिताराम राऊत यांना होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल मध्ये शूट करून त्यास मारहाण करा अशी चिथावनी देत होते. मला मारत असताना आरडाओरडा झाल्याने कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ तेथे आले व थोड्या वेळानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभे असलेले माझे मित्र राजू आव्हाड, चंद्रकांत वाकचौरे, राजीव खरात, रवी गिरी व दीपक अभंग मला वाचवण्यासाठी येत असल्याचे पाहून भारत भोसले याने त्याच्या मोबाईल मध्ये शूटिंग करणे थांबवले. भारत भोसले याने कविता संतोष अभंग व विद्या अभंग यांना मला दगड फेकून मारण्यास सांगितले. त्यावर दोघींनी मला दगड फेकून मारले. त्यातील एक दगड माझ्या पाठीवर, उजव्या खांद्यावर तसेच पायावर लागले तसेच काही दगड माझ्या पाठीमागे असलेल्या माझ्या कारला लागून कारचे नुकसान झाले. मारहाण झाल्यानंतर मला प्रथमेश अभंग व भारत भोसले यांनी शिवीगाळ करून तुझा काटाच काढतो तू आमच्या नादाला लागू नकोस असा दम दिला. त्यानंतर तेथे असलेले ज्ञानेश्वर मुटकुळे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, लखन राऊत यांनी आमचे भांडण सोडवले. त्यानंतर मी माझे मित्र असे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आलो त्यावेळी मला रवि गिरी यांनी दाखवले की त्याच्या मोबाईल मध्ये असणाऱ्या भारत संभाजीराजे भोसले ग्रुप मध्ये भारत भोसले याने त्याच्या मोबाईल मध्ये मला मारहाण करत असतानाची व्हिडिओ टाकून माझी समाजात बदनामी केली असल्याची फिर्याद जिल्हा परिषद सदस्य सिताराम पुंजा राऊत यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून पोलिसांनी.कविता अभंग, विद्या अभंग, प्रथमेश अभंग व भारत भोसले अशा चौघा विरुद्ध गु.र.नं. ८१०/२०२२ भा.द.वि कलम ३२७, ३३७, ३४१, ३२३, ५००, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
चौकट :-
घुलेवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा घुलेवाडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सिताराम राऊत यांना काल झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज मंगळवारी घुलेवाडीतील सर्व समाजातील नागरिकांनी घुलेवाडी बंदचे आवाहन केले आहे.