सोलापूर: : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादींसारख्या महापुरुषावर नजीकच्या काळामध्ये राज्यातील सत्ताधारी नेत्यांमध्ये वादग्रस्त व्यक्तव्य करून या महापुरुषांची अवमानना करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. याच्या निषेधार्थ आज १६ डिसेंबर रोजी सोलापूर बंद ची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच या बनाडला सोलापूरकरांनी कडकडीत बंद पाळत उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी याच प्रकरणी कडकडीत बंद पाळल्यानंतर सोलापुरात बंदची हाक देण्यात आली असून सोलापूरकरांनीही बंद पाळत आपला निषेध व्यक्त केलाय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने आज सोलापूर बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदला नागरिकांची उस्फूर्त प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद असून एरवी गजबजलेला परिसर असलेल्या बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने सोलापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसर आज बंद पाळला जात आहे. दुपारी २ पर्यन्त हा बंद पाळला जाणार आहे. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळ पासून सोलापुरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. या बंदल महाविकास आघाडी व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तर भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केला आहे
पोलिसांनी बंदच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. ९ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २७ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १५४ पोलीस अंमलदार, ४ राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, ९ जलद प्रतिसाद टीम शहरातील बंदोबस्तामध्ये सहभागी आहेत. अशी पथके शहरात तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.
राज्यपालांचा निषेध करण्यासाठी नागरिक आणि शिवजन्मोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सकाळी ९ वाजता सम्राट चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार असून सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होऊन रॅली काढणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन रॅलीची समाप्ती होणार आहे.