गोंदवले – श्री.ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या मुख्य दिवशी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन गोंदवल्यात वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.रविवार दि.18 रात्रीपासून हा बदल करण्यात येणार आहे.
श्री गोंदवलेकर महाराज यांच्या 109 वा पुण्यतिथी महोत्सव गेल्या आठ डिसेंबर पासून सुरू आहे.दहा दिवस चालणा-या या महोत्सवानिम्मित्त येथील समाधी मंदीरात भाविकांची गर्दी होत आहे.महोत्सवाचा मुख्य दिवस येत्या रविवारी असून पहाटे 5 वाजून 55 मिनीटांनी श्रीच्या समाधीवर गुलाल-फुलांची उधळण होणार आहे.या कार्यक्रमासाठी शनिवारी रात्रीपासूनच भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे श्रींचे समाधी मंदीर सातारा- लातुर महामार्गालगत आहे त्यामुळे या रस्त्यावरील वहातुक इतर पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे. रविवारी रात्री दोन ते सकाळी सात वाजेपर्यंत पिंगळी( खांडसरी चौक) पासून गोंदवल्यातील मुख्य चौकापासून पिंगळीकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या मार्गावरील वाहतुक साता-याकडुन अकलुजकडे जाण्यासाठी पिंगळी ( खांडसरी चौक ) ते दहिवडीमार्गे राणंद मार्डीवरून म्हसवडकडून वळविण्यात येणार आहे. तसेच पंढरपूर बाजुकडून साता-याकडे जाण्यासाठी म्हसवड ते मायणीमार्गे किंवा म्हसवड ते शिंगणापूर,फलटणमार्गे सातारा असा वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. याबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलिस अधिनिरम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दहिवडीचे स.पो.नि.अक्षय सोनवणे यांनी दिली.