राहाता ग्रामपंचायत निवडणूक -निवडणूक प्रक्रियेविषयी निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सत्र संपन्न

0

शंका – समाधानासाठी सोशल माध्यमांचा प्रथमच वापर

शिर्डी, दि.१४ डिसेंबर (उमाका वृत्तसेवा) – राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे राहाता येथे एकदिवसीय प्रशिक्षण सत्र पार पडले. तहसीलदार कुंदन हिरे यांच्या सूचनेनुसार मंडळाधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन, घ्यावयाची दक्षता यासह ईव्हीएम मशीन प्रत्यक्ष हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. 

या प्रशिक्षणास उपस्थित अधिकाऱ्यांच्या शंका-समाधानासाठी ‘राहाता ग्रामपंचायत प्रशिक्षण – २०२२ ’ वॉटस्ॲप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. ‘क्यूआरकोड स्कॅन’ केल्यावर एकाच वेळेस उपस्थित सर्व अधिकारी या ग्रुपमध्ये सहभागी झाले. तालुक्यातील साकुरी, रांजणखोल, खडकेवाके, सावळीविहीर बु.,  डोऱ्हाळे, आडगाव खु., न.पा.वाडी, निघोज, नांदुर्खी बु., नांदुर्खी खु.,व राजूरी या ११ ग्रामपंचायतीसाठी निवडणूका १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहेत. लोहगाव ही ग्रामपंचायत बिनविरोध पार पडली आहे.

निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या वेळेत, नियमाप्रमाणे होणे हे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत घ्यावयाची खबरदारी, यासोबतच मतदान करताना निर्माण होणारे संभाव्य प्रश्न, समस्या याबाबत परिपूर्ण माहिती या निवडणूक प्रशिक्षणातील पहिल्या सत्रात सादरीकरणाद्वारे देण्यात आली. दुसऱ्या सत्रात ईव्हीएम मशिनचे भाग असलेले बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आदींची माहिती प्रत्यक्ष हाताळणी प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. 

तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी ४९ केंद्रावर ३०० च्यावर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेत येणाऱ्या संभाव्य अडचणी, मतदान प्रक्रिया दिवसभर पार पाडताना मतदान केंद्रावरील उपस्थित सर्व कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना यांना मंडळाधिकारी शेख यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. निवासी नायब तहसीलदार तथा परिविक्षाधीन तहसीलदार विकास गंबरे यावेळी उपस्थित होते. 

निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्याला सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. त्यासाठी निवडणूक प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार हिरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here