ग्रामपंचायतीसाठी आज मतदान, पोलिसांकडून संचलन
संगमनेर : तालुक्यातील ३७ गावातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार असल्याने निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांसह स्थानिक पुढार्यांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान आज होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होणाऱ्या ३७ गावात कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांकडून काल शनिवारी संचलन करण्यात आले.
तालुक्यातील रहिमपूर, जोर्वे, कोल्हेवाडी, ओझर खुर्द, उंबरी बाळापूर, निंबाळे, मालुंजे, कनकापूर, सादतपूर, निमगाव जाळी, हंगेवाडी, साकुर, जांभुळवाडी, जांबुत बुद्रुक, रणखांब, दरेवाडी, डोळासणे, कर्जुले पठार, सायखिंडी, कोळवाडे, निमोण, निमगाव भोजापूर, चिकणी, धांदळफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, पोखरी हवेली, निळवंडे, करुले, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, चिंचोली गुरव, तळेगाव दिघे, पिंपरणे, घुलेवाडी, वाघापूर, खराडी, अंभोरे या ३७ गावात सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत (१० तास) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील आणि आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या नेतृत्वात वरील ३७ गावात पोलिसांनी काल दुपारी संचलन केले. आज होणाऱ्या मतदानानंतर मंगळवारी (दि.१८) शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल मध्ये सकाळी दहा वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार आहेत. आजच्या या मतदानाच्या निमित्ताने उमेदवारी करत असणाऱ्या उमेदवारांची व स्थानिक कार्यकर्त्यांची मात्र धाकधूक वाढली आहे.
मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी – तहसीलदार निकम
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी झाली असून मतदान पथके नेमलेल्या ठिकाणी रवाना झाली आहेत. ३७ ग्रामपंचायती पैकी सायखिंडी आणि डोळासने येथील सरपंच बिनविरोध झाले असून ३६७ सदस्यां पैकी ७३ सदस्य बिनविरोध झाले आहेत. आजच्या मतदान प्रक्रियेसाठी ३७ गावात १५८ मतदान केंद्र असून या केंद्रावर ७९० एकूण कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष १५८, मतदान अधिकारी १ व २ = ३१६, मतदान अधिकारी क्रमांक (महिला) १५८ आणि शिपाई १५८, राखीव मतदान अधिकारी व कर्मचारी ८० याप्रमाणे असून मतदान यंत्रे सी यु १५८ आणि बी यु २०९ आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.