संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खांडगेदरा या ठिकाणी दोन बिबट्यांनी धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याच्या पाच शेळ्यांचा फडशा पाडला. त्यामुळे तालुक्याच्या पठार भागात बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली असून या बिबट्यांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
खांडगेदरा या ठिकाणी शेतकरी मारुती पाराजी खांडगे यांच्या वस्तीवर दोन बिबट्यांनी रविवारी मध्यरात्री धुमाकूळ घालत पाच शेळ्यांना ठार केले तर या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहेत. सध्या कांदा लागवडीचे दिवस असल्यामुळे शेतकरी रात्रभर रात्रभर कांदा पिकाला पाणी भरत असतात. आता रात्रीच काय दिवसा ढवळ्या बिबटे आता मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. तालुक्यातील खांडगेदरा येथील पशुपालक शेतकरी मारुती पाराजी खांडगे यांच्या वस्तीवर रविवारी रात्री दोन बिबट्यांनी चाल करत शेतकरी खांडगे यांच्या पाच शेळ्यांचा फडशा पाडला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने या भागांमध्ये तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रांमस्थ करत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी कोैठे या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या सात शेळ्या बिबट्यांनी ठार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बिबट्यांनी शेळ्यांवर हल्ला करत पाच शेळ्या ठार केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यदाकदाचित हे बिबटे मनुष्यावरही हल्ला करू शकतात तेव्हा वनविभागांने तातडीने पठार भागातील घारगाव, कोैठे, खांडगेदरा आदी नदीकाठच्या भागांमध्ये पिंजरे लावून या बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गाने केली आहे.