कोपरगाव :- येथील रयत शिक्षण संस्थेच्या, एस. एस. जी. एम. कॉलेजमधील विज्ञान विभागाचे उपप्राचार्य व वनस्पती शास्त्राचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाबासाहेब वर्पे हे नियत वयोमानाप्रमाणे व शासकीय नियमाने ३० जून २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्रा.डॉ. बाबासाहेब वर्पे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. उज्ज्वला भोर यांनी भूषविले; तर विशेष उपस्थिती म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. संदीप वर्पे हे होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे उपस्थित होते. या मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कारमूर्तींचा सपत्नीक स्नेहवस्त्र, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालय सेवक कल्याण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींप्रा.डॉ.बाबासाहेब वर्पे यांना रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे आणि महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांनी शुभेच्छा पाठविल्या.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी डॉ.सुधीर तांबे म्हणाले, “ शिक्षणाची आज दुरावस्था झाली आहे.संशोधनावर खर्च करणे ही महाविद्यालयांची आज गरज झाली आहे. विकसित भारतासाठी हे फार महत्त्वाचे आहे .शिक्षणावर दूरदृष्टीने विचार करून संशोधन होणे महत्त्वाचे आहे. शिक्षण क्षेत्रात सामाजिक सहभाग फार महत्त्वाचा आहे .शिक्षणातून सामाजिक चळवळ उभी राहिली पाहिजे, त्यातून सामाजिक सलोखा निर्माण होईल. एक आदर्श कर्तव्यदक्ष सुजाण नागरिक निर्माण होण्याची आज गरज आहे.” सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले ॲड. संदीप वर्पे म्हणाले की,“रयतने सामाजिक परिवर्तनाची चळवळ निर्माण केली आहे. डॉ. वर्पे सरांनी महाविद्यालयात वृक्षारोपण करून पर्यावरणाची जाणीव जागृती केली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले”. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. उज्ज्वला भोर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य यांनी सांगितले की, “रयत सेवक हा सेवाभावी असतो रयत शिक्षण संस्था ही परिवर्तनवादी चळवळ आहे. त्या अनुषंगाने रयत सेवक काम करत असतो,त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होतो.त्यामुळे शासकीय नियमाने रयत सेवक निवृत्त होत असला तरी कर्मातून कधीही निवृत्त होत नाही.”
या मान्यवरांबरोबरच महाविद्यालयाचे माजी प्र .प्राचार्य डॉ. आर.आर.सानप यांनी सत्कारमूर्ती बरोबर असलेल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच्या मैत्रीला उजाळा दिला.वाणिज्य विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वनस्पती शास्त्र विभाग अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. महेश खर्डे, रमेश पाटील, गोकुळ वर्पे, विलास कवडे संचालक, राजहंस दूध संघ संगमनेर, प्रा. डॉ. बाळासाहेब वाघ उप प्राचार्य बी. एस. टी कॉलेज, संगमनेर इत्यादींनीही सत्कारमूर्तींच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला.
सदर कार्यक्रमासाठी डॉ.वाबळे वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख P.V.P. कॉलेज लोणी, डॉ.मनोहर पाचोरे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख, येवला कॉलेज येवला, डॉ बी. एस. गायकवाड. वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख. के जे सोमैय्या, कॉलेज,कोपरगाव यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयातील तीनही शाखांचे उपप्राचार्य, सौ.अंजनी वर्पे, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांसह पंचक्रोशीतील अनेक मानवरांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय सेवक कल्याण समितीचे चेअरमन,सदस्य व आयोजकांनी केले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. प्रा. डॉ. वैशाली सुपेकर व प्रा .डॉ. सीमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार महाविद्यालय सेवक समितीचे चेअरमन प्रा. चंद्रकांत खैरनार यांनी मानले.