कोपरगाव – “मी रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. महाविद्यालयाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ ही अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असतात. शिक्षकांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रभावी परिणामकारक तेवढे विद्यार्थी ज्ञानसमृद्ध होत असतात. ही परंपरा या महाविद्यालयाची आहे. एस.एस.जी.एम.महाविद्यालय हे एक ज्ञानमंदिर आहे.या महाविद्यालयाला NAAC समितीची A++ ग्रेड मिळाली, ही फार अभिमानाची गोष्ट आहे.”असे विचार महेंद्रकुमार काले यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे नुकताच शिक्षक दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी ते बोलत होते. तसेच त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनाला व घटनांना उजाळा दिला. शिक्षक दिनी मार्गदर्शन करताना त्यांनी महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन सेवकांचा श्री.काले यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ०५ सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवशी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकांचा यथोचित सन्मान करण्यात येतो. त्याचप्रमाणे या वर्षीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. महेंद्रकुमार काले हे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते सर्व प्राध्यापक व सेवांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या प्रा. डॉ. उज्वला भोर यांनी भूषविले.
अध्यक्षीय मनोगतात प्र.प्राचार्यां डॉ.भोर यांनी शिक्षकदिन साजरा करण्याविषयीची भूमिका मांडताना सांगितले की, “रयत शिक्षण संस्था ही नेहमीच गोरगरीब विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन काम करते आहे, शिक्षक आणि पालक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिक्षकांच्या छोट्या-छोट्या कृतीतून विद्यार्थ्यांवर संस्कार होत असतात.विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी रयत सेवकांवर अधिकत्वाने येते. कारण ज्ञान देणे किंवा माहिती पोहचविणे एवढ्यापुरते रयत सेवकांचे काम मर्यादित नाही तर नव्या युगाचा नवा माणूस घडविण्याची जबाबदारी पूर्ण करणे,हे त्यांचे कर्तव्य आहे”.
या समारंभासाठी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे ,वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.अर्जुन भागवत, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय शिंदे, विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.