कोळपेवाडी वार्ताहर:- गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाबाबत आपल्या अडचणी मांडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक मागील वर्षाप्रमाणे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातच घ्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कालवा सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हि बैठक लाभक्षेत्रात घ्यावी याबाबत आ.आशुतोष काळेंनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री व पालकमंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, मागील दोन वर्ष गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात होत असल्यामुळे सदर बैठकीस लाभधारक शेतकऱ्यांच्या व पाणीवापर संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मदत होत होती. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयानुसार मिळणाऱ्या आवर्तनाचे योग्य नियोजन करणे लाभधारक शेतकऱ्यांना व पाणीवापर संस्थांना सोयीचे होते.
परंतु हि बैठक नागपूर येथे झाल्यास या बैठकीला लाभधारक शेतकऱ्यांना उपस्थित राहता येणार नाहीत व आपल्या अडचणी देखील मांडता येणार नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी अडचणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. याचा गांभीर्याने विचार करून (दि.२२) रोजी दुपारी ४.०० वाजता होणारी बैठक हि लाभक्षेत्रातच घेण्यासाठी संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.