संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील केळेवाडी नजीक वडदरा या ठिकाणी घरात टीव्ही पाहत असणाऱ्या व्यक्तीला बिबट्याने थेट घरामध्ये घुसून ठार केल्याची घटना शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली होती. मात्र आता या घटनेमागे नवा ट्विस्ट आला असून उत्तम कुऱ्हाडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लवकरच शवविच्छेदन अहवालातून या बाबी उघड होणार आहेत. त्या दृष्टीने घारगाव पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.
पठार भागातील बोटा गावांतर्गत असलेल्या वरदरा केळेवाडी या ठिकाणी उत्तम कुऱ्हाडे हे रात्री सव्वा आठच्या दरम्यान त्यांची आई कासाबाई यांच्यासोबत घरात होते. त्याच दरम्यान बिबट्याने थेट घरामध्ये घुसून कुऱ्हाडे यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे ते जागीच ठार झाले. त्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली असे सांगितले जात होते. मात्र वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आल्यावर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मयत उत्तम कुऱ्हाडे यांच्या मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता त्यांना या ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या कोणत्याही बाबी घटनास्थळी दिसून आल्या नाहीत. काहींनी या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिल्यावर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे राजेंद्र लांघे प्रमोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली या वेळी उत्तम कुऱ्हाडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर कुऱ्हाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयामध्ये पाठवला गेला मात्र रविवारी सकाळी कुऱ्हाडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर उत्तम कुऱ्हाडे यांचा मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाला नसून त्यांचा मृत्यू दुसऱ्याच कारनाने झाला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घारगाव पोलिसांकडे व्यक्त केला. या घटने प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडेकर आणि वनाधिकारी सचिन लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर लवकरच या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती घारगाव पोलिसांनी दिली आहे. मयत कुऱ्हाडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान नगर येथील श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र घटनास्थळी रक्ताचा सडा वगळता इतर काही संशयास्पद वस्तूं न आढळल्यामुळे श्वान पथकाला माघारी जाव लागले.
उत्तम कुऱ्हाडे यांचा घातपात झाला असावा असा संशय आता व्यक्त केला जात असून कुऱ्हाडे यांचा परिसरामध्ये कुणाशी वाद होता का ? याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कुऱ्हाडे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले मात्र खर कारण हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणार आहे.