कोपरगाव प्रतिनिधी :- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार कै. के.बी. रोहमारे (दादा) यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन संपन्न झाले. ही स्पर्धा दि.24 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत होत असून या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, रमेशराव रोहमारे, राहुल रोहमारे, कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संदिपराव रोहमारे, सचिव सत्येन मुंदडा, सुनिल बोरा, सुरेश शिंदे, दिनार कुदळे, एस.पी.कुलकर्णी, आजिनाथ ढाकणे, अतुल शिंदे, सागर रोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या बॅडमिंटन स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध खेळाडू, संघनायक, मार्गदर्शक व क्रिडा रसिक उपस्थित राहणार आहे. तीन दिवस खेळल्या जाणाऱ्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून अनेक खेळाडू आपला सहभाग नोंदविणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 15 वर्षाखालील वयोगटातील 63 स्पर्धकांनी तर 19 वर्षाखालील वयोगटातील 28 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे. तसेच पुढील दोन दिवसामध्ये पुरूष दुहेरी, महिला दुहेरी व मिक्स डबल ग्रुप मध्ये 64 स्पर्धक ही स्पर्धा खेळणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजकत्व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांनी घेतले असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.आशुतोषदादा काळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. एस. के. बनसोडे यांनी केले. या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे, क्रिडा शिक्षक मिलिंद कांबळे व सर्व क्रिडाप्रेमी करणार आहेत.