कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि सुरेगाव या दोन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत दिली आहे. सरकारने अतिवृष्टीची नुकसान भरपाई देताना भेदभाव न करता पोहेगाव व सुरेगाव या सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिली, तशीच नुकसान भरपाई कोपरगाव, दहेगाव (बोलका) आणि रवंदे या तीन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनादेखील त्वरित वाटप करून दिलासा द्यावा, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले की, मागील वर्षी २०२२ मध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे खरीप हंगामातील पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडले होते. रब्बी हंगामातही सततच्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली होती. आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधीही मंजूर केलेला आहे.
शासननिर्णयानुसार कोपरगाव तालुक्यातील पाच सर्कलपैकी पोहेगाव आणि सुरेगाव या दोन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी २७ हजार रुपये, जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये व फळबाग क्षेत्रासाठी हेक्टरी ३६ हजार रुपये याप्रमाणे आर्थिक मदत मिळाली आहे. मात्र, कोपरगाव, दहेगाव (बोलका) व रवंदे या तीन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळालेली नाही. सरकारने पोहेगाव आणि सुरेगाव या दोन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे आर्थिक मदत मंजूर केलेली आहे, तशीच आर्थिक मदत कोपरगाव, दहेगाव (बोलका) आणि रवंदे या सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही तात्काळ द्यावी. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश द्यावेत, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.
गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना कसलाही भेदभाव करू नये. कोपरगाव, दहेगाव (बोलका) व रवंदे या तीन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनासुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.