कोल्हेंनी ते विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नसल्याचे सिद्ध केले – उपसभापती गोवर्धन परजणे

0

शिरसगाव उपबाजार समितीच्या काँक्रीटीकरण कार्यक्रमावर काळे, परजणे, औताडे गट बहिष्कार टाकणार

कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे राजकारण आणायचे नाही असे ठरले असतांना मात्र श्रेय घेण्यासाठी कोल्हे गटाने काळे, परजणे, औताडे गटाच्या संचालकांना विश्वासात न घेता शिरसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्याचा जो घाट घातला आहे त्या कार्यक्रमावर काळे, परजणे, औताडे गटाचे संचालक बहिष्कार टाकून निषेध नोंदवणार असल्याचा ईशारा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळे, कोल्हे, परजणे, औताडे यांच्या गटाचे सदस्य असून सभापतीपती पद कोल्हे गटाकडे तर उपसभापतीपद काळे गटाकडे आहे. आजपर्यंत सर्व संचालकांनी एकत्रितपणे निर्णय घेवून सहमतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यभार सुरु असतांना राजकीय हेतूने श्रेय घेण्यासाठी कोल्हे गटाने शिरसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात ५५ लक्ष रुपये खर्च करून काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात हा निर्णयच घटनाबाह्य असल्याचे काळे, परजणे, औताडे गटाच्या सदस्यांनी म्हटले आहे.

वास्तविक पाहता कृषी उत्पन्न बाजार समितीला आ.आशुतोष काळे, मा.जी.प. सदस्य राजेश परजणे, शिवसेना नेते नितीन औताडे यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळत आले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजकीय जोडे बाजूला ठेवून आजवर निर्णय घेतले गेले आहे. मात्र कोल्हे गटाने श्रेय घेण्यासाठी शिरसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात सोमवार (दि.०७) रोजी काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतांना काळे, परजणे, औताडे यांच्या गटाच्या एकाही संचालकांना विश्वासात घेतले नाही त्यामुळे आमचा या कार्यक्रमाला विरोध आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामे मार्गी लागावे व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सहाय्यक निबंधकापासून ते पणन संचालकापर्यंत सर्वच संचालकांनी प्रयत्न करून आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कामे मंजूर करून आणली आहेत. याकामी मा.जी.प.सदस्य राजेश परजणे, शिवसेना नेते नितीन औताडे यांचे सहकार्य लाभले आहे. यापूर्वीच या कामांना गती द्यावी असे वारंवार काळे, परजणे, औताडे गटाच्या संचालकांनी सांगितले मात्र पुढे असे कुटील कारस्थान करायचे असल्यामुळे त्याबाबत त्यावेळी टाळाटाळ केली गेली हे यावरून दिसून येत आहे.

 संचालक मंडळाचा ठराव नसतांना, कार्यारंभ आदेश देखील काढलेला नसतांना व याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला विचारले असता त्यांनी देखील कानावर हात ठेवले आहे. त्यामुळे राजकीय श्रेय लाटण्यासाठी हा काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्याचा एकतर्फी निर्णय घेवून कोल्हे गटाने आपले रंग दाखवून देतांना कोल्हे विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे शिरसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात होणाऱ्या काँक्रीटीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रमावर काळे, परजणे, औताडे गटाचे संचालक बहिष्कार टाकून निषेध नोंदवणार असल्याचे उपसभापती गोवर्धन परजणे यांच्या बरोबरच संचालक संजय शिंदे, शिवाजीराव देवकर, राजेद्र निकोले, रामदास केकाण, ऋषिकेश सांगळे, लक्ष्मणराव शिंदे, खंडू फेफाळे, अशोकराव नवले, सौ. मीरा कदम यांनी  दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here