गणेश परिसरातील शेतकऱ्यांची दहा वर्षे केलेल्या लुटीची भरपाई प्रवरेचे नेतृत्व देणार का ? विजय दंडवते

0

आम्ही ‘गणेश’ च्या सभासदांना चांगला भाव देऊ; तुम्ही तुमच्या वजन काट्याची गॅरंटी घ्या – राहाता प्रतिनिधी : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच चांगला भाव मिळेल याबाबत विखे पाटील यांनी निश्चिंत असावे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी ‘गणेश’ चे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. मात्र, विरोधकांनी आधी स्वत:च्या कारखान्याच्या वजन काट्याची गॅरंटी घ्यावी. कारण यापूर्वी अनेकदा वजन  काट्याबाबत त्यांच्या संभासदांमध्ये संशय यापूर्वी व्यक्त झालेला आहे. तसेच गणेश परिसरातील शेतकऱ्यांची दहा वर्षे जी लूट झाली त्याची भरपाई प्रवरेचे नेतृत्व देणार का, अशी प्रतिक्रिया गणेश साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता व्यक्त केली आहे.

विवेक कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेताना गणेश साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गणेश कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विखे पाटील यांना जळीस्थळी फक्त विवेक कोल्हे हे नाव दिसू लागले आहे. वास्तविक पाहता कोल्हे यांनी वारंवार आपल्या वक्तव्यात विखे पाटलांचा आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. विवेकभैय्या हे सुसंस्कृत नेते आहेत. ते नेहमीच ज्येष्ठांचा आदर करतात. सहकारी संस्थेत राजकारण करायचे नसते, सभासदांचे हित जोपासायचे असते, याची शिकवण त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेली असून, त्यानुसारच ते सदैव जनसेवेसाठी कार्यरत आहेत. एका सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे भांडवल करून त्याचा संबंध विधानसभा निवडणुकीशी किंवा पक्षीय राजकारणाशी जोडणे विखे पाटलांना शोभणारे नाही. सातत्याने शेतकऱ्यांच्या, जनतेच्या हिताचा विचार करणारे विवेक कोल्हे यांच्या वयाचा व अनुभवाचा दाखला देऊन स्वत:चे अपयश लपवणे हे हास्यास्पद आहे, अशी टीका विजय दंडवते यांनी केली आहे.

कुणाचे बोट धरून राजकारण करणे हा कोल्हे कुटुंबाचा पिंड नाही, तर विकासाचे बोट धरण्याची कोल्हे कुटुंबाची संस्कृती आहे. कोल्हे कुटुंबाने आजपर्यंत अनेकदा नगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. मात्र, तालुक्या-तालुक्यातील नेते खुडवण्याचे काम कधीही केले नाही, तर नेत्त्यांना, कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांना वाढविण्याची भूमिका ठेवली. एकटे लढण्याचा कोल्हे यांचा कायमच इतिहास राहिला आहे. सोयऱ्या-धायऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला हेतू साध्य करणे हा प्रकार कोण करते हे संपूर्ण नगर जिल्ह्याला व महाराष्ट्राला माहीत आहे, असा टोला दंडवते यांनी लगावला आहे.    

विखेंनी ‘गणेश’ च्या सभासदांना चांगला भाव मिळेल का याची अजिबात चिंता करू नये. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गणेश’ चे संचालक मंडळ सभासदांना निश्चितच चांगला भाव देईल याबाबत विखेंनी निश्चिंत असावे. मात्र, ‘गणेश’ परिसराची दहा वर्षे जी हानी झाली त्याची नैतिक जबाबदारी विसरून राजकीय द्वेषापोटी बातम्या देऊ नये, असे दंडवते यांनी म्हटले आहे.कोल्हे हे कुणाचे बोट धरून चालतात यावर विचार करणाऱ्या विखे पाटील यांनी आपल्या विसंगत भूमिकेमुळे गणेश परिसराने आपले बोट केव्हाच सोडले आहे याचा विचार वेळीच करावा,अन्यथा शिर्डी मतदारसंघातील नागरिक देखील आगामी काळात त्यांचे बोट सोडल्याशिवाय राहणार नाहीत,असे विजय दंडवते यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here