अन्यथा मनपावर मोर्चा काढणार ; विनायक राज प्रतिष्ठानचा आयुक्तांना निवेदनाद्वारे इशारा
नगर – सावेडी उपनगरातील प्रभाग क्र.4 मधील रहदारीचा महत्वाचा असणारा गुलमोहोर मार्ग पुर्णपणे अंधारात आहे. तर बीएसएनएल रस्ता, गुलमोहोर हौशिंग सोसायटी, एकता कॉलनी, अर्बन बँक कॉलनी आदि भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रचंड त्रास आहे. मनपाने या दोन्ही गंभीर विषयामध्ये लक्ष घालून आठ दिवसांत गुलमोहोर रोडवरील पथदिवे सुरु करुन मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा 100 नागरिक मनपावर कंदील व मोकाट कुत्रे घेऊन मोर्चा काढण्याची आमची तयारी आहे, असे निवेदन विनायकराज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विनय वाखुरे यांनी नागरिकांसह आयुक्त यशवंत डांगे यांना दिले. निवेदन देऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत विनय वाखुरे, ओंकार गुर्रम, अनिल लगड, रवि सोनवणे, अजिंक्य आढाव, आदित्य आढाव आदिंनी समस्या मांडल्या.
गुलमोहोर रोडवरील रस्त्यांच्या कामासाठी बर्याच वर्षांपासून विजेचे खांब काढले. रस्ते झाले, पण खांब मात्र बसविले नाहीत, त्यामुळे या महत्वाच्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रात्री चेन स्नेचिंगचे प्रकार वाढत आहे. नवीन पोल बसविले, त्यावर देखील लाईट बंद आहेत. लवकरात लवकर राहिलेले खांब बसवून नवीन असलेल्या पोलवरील दिवे सुरु करावे, असे वाखुरे यांनी आयुक्तांना सांगितले.
अंधारामुळे रात्री मोकाट कुत्रे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर धावतात. गुलमोहोर पोलिस चौकात सकाळी मोकाट जनावरे ठाण मांडून रहदारीस अडथळा करतात. तरी या जनावरांचा बंदोबस्त मनपाने तातडीने करावा, असे ओंकार गुर्रम यांनी म्हटले. या चर्चेनंतर आयुक्त डांगे यांनी लवकरात लवकर हे काम मार्गी लावू, असे आश्वासन दिले.