गौणखनिज उपलब्ध करून देण्यासाठी चंदनापुरी ग्रामपंचायतीचे तहसीलदारांना पत्र

गौणखनिज उपलब्ध होत नसल्याने खाजगीसह शासकीय कामे रखडली

0

वाळू, खडी, दगड व मुरूमा अभावी घरकुलांची कामे रखडली  

 संगमनेर : तालुक्यातील चंदनापुरी गावात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ३५, शबरी आवासची ३, रमाई आवासची ७ अशी ४५ घरकुले गोरगरिबांसाठी मंजूर आहेत. मात्र, घरकुलांच्या  बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी, दगड व मुरूम आदी महत्त्वाचे साहित्य उपलब्ध होत नसल्याने घरकुलांचे बांधकामे रखडली आहेत. हि कामे पूर्ण करण्यासाठी गौणखनिज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी चंदनापुरी ग्रामपंचायतीने तहसीलदार अमोल निकम यांना पत्राद्वारे केली आहे. 

          तालुक्यातील ५७ स्टोन क्रेशर धारकांना महसूल प्रशासनाने तब्बल ७६५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. उत्खनन झालेल्या गौण खनिजाचे मोजमाप केले असता यामध्ये ५७ स्टोन क्रेशर चालक दोषी आढळल्याने त्यांना तहसीलदार अमोल निकम यांनी दंडाची नोटीस बजावली आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी त्यांना महिनाभराची मुदत देण्यात आलेली आहे. महिनाभरात दंडाची रक्कम न भरल्यास पुढील कारवाई होणार आहे. मात्र, या कारवाईमुळे गौणखनिज उपलब्ध होत नसल्याने खाजगीसह शासकीय कामे रखडली आहेत. तालुक्यातील अनेक गावात घरकुले मंजूर असूनही साहित्याअभावी याचा फायदा लाभधारकांना होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे शासनाने घरकुले पूर्ण करण्याचा तगादा लावला असताना दुसरीकडे शासनानेच गौणखनिज व वाहतुकीवर कडक निर्बंध लावले आहेत. शासनाने काही मार्ग काढला नाही तर मागेल त्याला घर हे उद्दिष्ट पूर्ण होणार का ? हा मोठा प्रश्न गावगाडा हाकणाऱ्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांपुढे पडला आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर असलेली घरकुले या साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे होऊ शकली नाहीत. मग उर्वरित मंजूर घरकुले बांधायची तरी कधी ? चंदनापुरी ग्रामपंचायतने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना तालुक्यातील घरकुल योजना पूर्ण करण्यासाठी गौणखनिज पुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, या मागणीचा फॅक्स पाठविला आहे. तर आमदार बाळासाहेब थोरात, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना पत्र व्यवहार केला आहे. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी गौणखनिजसाठी ठराव करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असे आवाहन चंदनापुरीचे सरपंच शंकर राहाणे, उपसरपंच भाऊराव राहाणे व सदस्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here