गांधी जयंती व स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न
कोपरगाव( वार्ताहर) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसा ही शिकवण देत संपूर्ण जगामध्ये आदर्श निर्माण केला. स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल केली तर शहरांप्रमाणेच खेड्यांचाही विकास होईल असे ते नेहमी सांगत. त्यांच्या जयंतीनिमित्त शहापूर मध्ये स्वच्छता अभियान राबवून घनकचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घंटागाडी उपलब्ध करून दिल्याने घनकचऱ्याचे व्यवस्थापन होऊन गाव स्वच्छ राहील असे प्रतिपादन सरपंच YOGITA GHARE योगिता घारे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतलेल्या घंटागाडीचे लोकार्पण व गांधी जयंती तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करताना त्या बोलत होत्या.गावातील प्रमुख ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायतीच्या आवारातील साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता अभियानामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक श्री रहाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की गावात स्वच्छता राहिली तर गावचा विकास होतो. ग्रामपंचायतीने आता घंटागाडीची व्यवस्था करून दिली आहे त्यामुळे नागरिकांनी इतरत्र कचरा टाकण्यापेक्षा घंटागाडीत आपला कचरा आणून टाकावा त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात येईल त्यामुळे आरोग्यासह स्वच्छतेचा प्रश्न जाणवणार नाही असे त्यांनी सांगितले.स्वच्छता अभियानामध्ये श्रमदान करण्यासाठी स्वतःहून गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी ,राज कोचिंग क्लास शहापूरचे विद्यार्थी व गावातील सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ अदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नंदू दिघे यांनी केले तर आभार उपसरपंच सागर घारे यांनी मानले.