संगमनेर : नाशिक -पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने पुढे चाललेल्या दोन दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत एक ठार तर तीन जखमी झाले. सदरचा अपघात सोमवार दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला.
याबाबतची माहिती अशी की नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून उत्तर प्रदेश येथील अरविंद कुमार यादव हा त्याच्या ताब्यातील टेम्पो क्रमांक एम.एच ४७ ए एस २७६१ हा घेऊन आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेने जात होता. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो चंदनापुरी घाट परिसरातील हॉटेल साईप्रसाद समोर आला असता या महामार्गावरून पुढे जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच १७ ए वाय ६६३० व एम.एच १७ सी डब्ल्यू ३७८१ या दोन दुचाकींना टेम्पोने मागुन जोराची धडक दिली या जोरदार धडकेत एका दुचाकी वरील शुभम दादाभाऊ फटांगरे (वय २३) रा.पोखरी बाळेश्वर ता. संगमनेर हा तरुण जागीच ठार झाला तर दादाभाऊ भाऊसाहेब फटांगरे (वय ५५) रा.पोखरी बाळेश्वर ता.संगमनेर तसेच दुसऱ्या दुचाकी वरील अमोल नालकर (वय २५) आणि महेश्वरी बाळासाहेब अग्रे (वय २३) दोघेही रा.लोणी तालुका राहाता असे तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यावर भरधाव टेम्पो रस्त्यावर आडवा झाला होता. यामध्ये टेम्पो चालक अरविंद कुमार यादव हा किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती समजताच डोळासने महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पो.हे.कॉ पंढरीनाथ पुजारी, नारायण ढोकरे, भारत गांजवे, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, नामदेव बिरे, अनिल भांगरे आदींनी मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलिसांनी रस्त्यावर आडवा झालेला टेम्पो बाजूला केल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.