शिर्डी : सी एम साहेब आम्ही तुमच्याकडे आमचे काही प्रश्न- समस्या मांडल्या आहेत त्या समस्या प्रश्न तुम्ही जर सोडवले तर आमचे शिक्षक तुमचे आयुष्यभर तुमचे गुलाम राहून तुमची आयुष्यभर सेवा करू अशा स्वरूपाचे वादग्रस्त वक्तव्य उत्तर महाराष्ट्र- नाशिक शिक्षक मतदार संघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी केल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
सध्या नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये प्रचाराचा जोर वाढला असून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहे. आधीच या निवडणुकीमध्ये प्रचाराची पातळी बऱ्यापैकी खालावली आहे. यावेळी दराडे यांना महाआघाडी सोबतच अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी कडवे आव्हान उभे केले आहे. अत्यंत चुरस वाढलेल्या या निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून अशातच महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचे शिक्षकांबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य समोर आल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
लोणी येथे शिक्षक आणि संस्थाचालकांच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार किशोर दराडे भाषण करत असताना म्हणाले की ,मुख्यमंत्री साहेब आम्ही मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे शिक्षकांचे प्रश्न मांडले आहेत. साहेब आपण शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्यावर उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक कायम तुमचे गुलाम म्हणून राहतील आणि आयुष्यभर आपली सेवा करतील असे विधान केल्याने वाद निर्माण होण्याची आणि याला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
किशोर दराडे हे एका शिक्षण संस्थेचे संचालक आहेत त्यामुळे त्यांच्या संस्थेमधील शिक्षक त्यांचे सेवक असतीलही . मात्र आपल्या ताब्यातील शिक्षक असो अथवा नाशिक शिक्षक मतदार संघातील शिक्षक असो त्यांना परस्पर गुलाम म्हणून जाहीर करण्याची दराडे यांना कोणी परवानगी दिली आहे ? असा सवाल शिक्षांकडून विचारला जाऊ लागला आहेत. आधीच किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सभेदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी व्हिडीओ ट्वीट करीत केला आहे. त्यात आता दराडे यांनी आपल्या वादग्रस्त विधानाने भरच पडली आहे .