तळेगाव दिघेत गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

0

संगमनेर : तालुक्यातील तळेगाव दिघे येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र पोलीस गाडी येत असल्याचे लक्षात आल्यावर चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. सदरची घटना गुरुवार दि.६ एप्रिलच्या पहाटे ४.४५ वाजेच्या सुमारास घडली.

          तळेगाव दिघे येथे इंडियन ओव्हरसीज बँकेची शाखा असून या शाखे जवळच या बँकेचे एटीएम मशीन आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांचा हा प्रयत्न सुरू असतानाच काही स्थानिक युवकांच्या लक्षात चोरी होत असल्याची बाब लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्याच दरम्यान गस्तीवर असलेली पोलीस पथकाची गाडी तातडीने तळेगाव दिघे येथे पाठवण्यात आली. पोलीस गाडीची चाहूल चोरट्यांना लागल्याने एटीएम फोडण्याच्या धुंदीत असणारे चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. एटीएम मशीनच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेला या चोरट्यांनी चिखल लावला होता मात्र स्थानिक युवकांच्या व पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम मधील रक्कम आबाधीत राहिली व एटीएम फोडीचा प्रयत्न फसला. यापूर्वी देखील चोरट्यांनी इंडियन ओव्हरसीज बँक शाखेचे एटीएम फोडून मोठी रक्कम लंपास केली होती, तसेच दोन वेळेला टाटा इंडिकॉमचे एटीएम फोडूनही रक्कम लंपास करण्यात आली होती. त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्यांदा इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील,पो.ना बाबा खेडकर आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळपर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here