संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारकडून निधी मिळवून तालुक्यात अनेक विकासाच्या योजना राबविल्या आहेत. २०२३ च्या अर्थसंकल्पातून तालुक्यातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी तब्कोबल ८६ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मिळविल्याबद्दल विविध गावातील ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करून आनंद व्यक्त केला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर तालुक्यातील राजापूर, घुलेवाडी , मालदाड, नान्नज दुमाला ,सुकेवाडी, चिकणी, चिखली, पेमगिरी तळेगाव, देवकौठे या गावांमधील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केला. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, कारखान्याचे व्हा. चेअरमन संतोष हासे, जि.प.सदस्य रामहरी कातोरे, सिताराम राऊत, उपसभापती नवनाथ अरगडे, दुध संघाचे संचालक विलास वर्पे, भारत वर्पे, हौशीराम सोनवणे आदिंसह वरील गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रांमस्थ उपस्थित होते.
काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांसाठी निधी मिळवला होता. मात्र तांत्रिक मंजुरी नसल्याने या कामाला सुरुवात होत नव्हती. याबाबत विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधी मांडल्यानंतर या कामांना संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडून लगेच मान्यता मिळाली.यामध्ये घुलेवाडी फाटा, गुंजाळवाडी, राजापूर, निमगाव भोजापूर, चिकणी (वर्पे वस्ती) या ११ किमी रस्त्यांसाठी (९ कोटी १७ लाख) तसेच राजापूर ते चिखली रोड या ३.३०० किमी रस्त्यांसाठी ( ३ कोटी ७३ लाख) तसेच मालदाड,सोनोशी,चिंचोली गुरव या १९ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामांचा समावेश आहे.याचबरोबर निमगाव भोजापूर येथील म्हाळुंगी नदीवरील पुलास तीन कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी असून प्रत्येक गावात शासनाच्या विविध योजना राबवल्या गेल्या आहेत. सहकार, शिक्षण, समाजकारण, आर्थिक क्षमता या सर्व क्षेत्रात संगमनेर तालुका हा राज्यात अग्रगण्य ठरला आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण सातत्याने काम करत आहोत. संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे.तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्यात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. यातून संगमनेर तालुक्याचा राज्यभरात सन्मान वाढेल असेच काम आपण केले आहे. निळवंडे कालव्यांद्वारे दुष्काळी भागातील जनतेला पाणी देणे हे आपले स्वप्न आहे. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सत्ता येेेते आणि जाते मात्र अशा काळातही आपण जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून काम केले पाहिजे. नव्याने अनेक विकास कामे होणार असून तालुक्याच्या विकासाची घोडदौड अशीच सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. रामहरी कातोरे म्हणाले की आमदार थोरात यांच्या माध्यमातून प्रत्येक वाडी वस्तीवर विकासाच्या योजना पोहोचल्या आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला आमदार थोरात यांचा अभिमान असून सर्वांनी यापुढे त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी मानले.