कोपरगाव : कोपरगावची कन्या दर्शना पवार हिची पुणे येथे राजगडाच्या पायथ्याशी झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज कोपरगावात मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलकांनी कोपरगाव तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं. तसेच दर्शनाच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली . या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसह जोरदार घोषणा दिल्या.
या मोर्च्यामध्ये बाळासाहेब संधान , भरत मोरे , सुनील देवकर ,बाळासाहेब रुईकर , अशोक आव्हाटे, कृष्णा आढाव ,बाळासाहेब आढाव ,ऍड. मनोज कडू , ऍड. शंतनू धोर्डे, मनोज नरोडे, शैलेश साबळे , बाळासाहेब देवकर ,राजेंद्र आभाळे,सुनील शिलेदार , राजेंद्र वाकचौरे आदींसह मोठा संख्येने समाज बांधव आणि महिला सहभागी झाले होते. यावेळी मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार याना निवेदन देण्यात आले .
दर्शना पवारच्या मारेकऱ्याला मुंबईतुन अटक
दरम्यान दर्शना पवार हिची हत्या झाल्यानंतर अखेर पाच दिवसाने तिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी मुंबई येथे पकडले . त्यानेच दर्शनाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना हिचा मारेकरी राहुल हंडोरे अखेर पाच दिवसानंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या हत्येमागचं कारणही समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. बेपत्ता असलेल्या दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सापडला होता. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यात तिची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. तसेच पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं होतं. त्यात दर्शना आणि राहुल हंडोरे हे बाईकवरून जाताना दिसत होते. त्यामुळे राहुल यानेच तिची हत्या केल्याचं उघड झालं होतं.