–छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाला प्रशासनाने विद्युत रोषणाई न केल्याने भाजपतर्फे निषेध
कोपरगाव : Kopargaon ज्या महापुरुषांनी समाजाला दिशा दिली, ज्यांनी आपल्या आयुष्यात दिवाळी आणली, सुख-समृद्धी आणि आनंदाचे दीप प्रज्वलित केले त्या महापुरुषांच्या स्मारकाची दिवाळी सणानिमित्त साफसफाई व विद्युत रोषणाई करताना प्रशासनाने भेदभाव केला आहे. यंदा दिवाळीला नगर परिषद प्रशासनाने शहरातील फक्त छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच स्मारकाची साफसफाई व विद्युत रोषणाई केली असून, छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची साफसफाई केली नाही व विद्युत रोषणाईदेखील केली नाही. या दोन्ही महापुरुषांचा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना व नगर परिषद प्रशासनाला चक्क विसर पडला असून, त्याबद्दल भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले D.R . Kale यांनी लोकप्रतिनिधी व नगर परिषद प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे.
आमदार साहेब छोट्या-छोट्या कामाचे श्रेय घेण्यासाठी नेहमीच पुढे असतात. आमदारांचा प्रशासनावर अजिबात वचक नाही. त्यामुळे प्रशासन मनमानी कारभार करत आहे. नगर परिषद प्रशासनाने दिवाळी सणानिमित्त कोपरगाव शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई व विद्युत रोषणाई करताना छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची साफसफाई व रोषणाई मात्र केली नाही. प्रशासनाने या दोन महापुरुषांच्या स्मारकाला जाणूनबुजून वगळले. सतत छोट्या-छोट्या कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपडणाऱ्या आमदारांनी त्याचेही श्रेय घ्यायला हवे, असा टोलाही काले यांनी लगावला आहे.
कालपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने कालच शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई, रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करायला हवी होती; परंतु आम्ही काल आठवण करून दिल्यानंतर उशिराने प्रशासनाने शहरातील केवळ छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची साफसफाई व विद्युत रोषणाई केली. मात्र, यातून छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला वगळण्यात आले. प्रशासनाकडून शुक्रवारी सायंकाळपर्यंत छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची साफसफाई करून स्मारकाभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली नव्हती. प्रशासनाच्या या बेपर्वाई व मनमानीबद्द्ल नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे.
ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाचे क्षण आले, त्यांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला कसा काय विसर पडला? असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले यांनी उपस्थित केला आहे. याबद्दल लोकप्रतिनिधी व नगर परिषद प्रशासनाचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष डी. आर. काले यांनी तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची साफसफाई व विद्युत रोषणाई केली नसली तरी भाजपच्या वतीने या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची साफसफाई करून विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याचे काले यांनी सांगितले.