देवळाली प्रवरा येथील ह.भ.प. बाबुराव गवळी महाराज यांचे दुःखद निधन

0

टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत  अखेरचा निरोप देण्यात आला.

देवळाली प्रवरा : नर्मदा परिक्रमा पायी प्रवास करणारे देवळाली प्रवरा शहरातील प्रथम व्यक्तिमत्त्व ह.भ.प बाबुराब महाराज गवळी यांचे दुःखद निधन झाले आहे.  साश्रु नयनांनी, टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

   ह.भ.प बाबुराव महाराज गवळी यांना हृदय विकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना शिर्डी येथे साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी देवळाली प्रवरा शहरात समजताच सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला.

ह.भ.प बाबुराब महाराज गवळी हे नर्मदा परिक्रमा पायी प्रवास करणारे देवळाली प्रवरातील प्रथम वारकरी असून ते समर्थ बाबुराव पाटील महाराज पायी दिंडी सोहळ्याचे विणेकरी तर सदगुरू गंगागिरी  महाराज सप्ताहाचे टाळकरी होते.

रविवारी सकाळी टाळ मृदंग निनादात, हरिनामाच्या जयघोषात  स्व.बाबुराव महाराज गवळी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या  अंत्ययात्रेत वारकरी, टाळकरी, हरिभक्त परायण मंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

 देवळाली प्रवरा शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी  अतिशय नम्र व धार्मिक वृत्तीचे गवळी महाराज मामा यांना निरोप देताना उपस्थितांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.

यावेळी दुर्गाप्रसाद महाराज तिडके, बाबा महाराज मोरे, शिंदे महाराज, माऊली महाराज शेळके,  दत्तात्रय कडू , राजेंद्र लोंढे, डॉ. अशोक मुसमाडे, आनंद कदम, राजू चव्हाण, कांता कदम यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मयत बाबुराव गवळी यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी असा परिवार  आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here