निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी सालीमठ

0

विधानमंडप कक्षाला शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भेटी*

अहिल्यानगर, दि.१८ –  कोणत्याही प्रलोभनाला, दबावाला बळी न पडता निर्भयपणे व मुक्तपणे मतदान करण्याचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम विद्यार्थ्यांनी आणि कलापथकाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आवारात उभारण्यात आलेल्या विधानमंडप कक्षास भेटीप्रसंगी राधाबाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी राहुल पाटील, मतदारदूत अमोल बागुल आदी उपस्थित होते. 

विविध संस्था आणि शाळा – महाविद्यालयांनी चांगल्या पद्धतीने मतदार जागृती केल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी म्हणाले, शेवटच्या दोन दिवसात मुक्तपणे मतदान करण्याचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवा. जिल्ह्यात अधिकाधिक मतदान व्हावे असा सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. अधिक मतदान झालेले गाव, मतदारसंघ, चांगली जनजागृती करणारी शाळा – महाविद्यालयांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी शिवाजी नाईकवाडे यांच्या पथकाने मतदार जागृतीचे पथनाट्य सादर केले. आतापर्यंत या कक्षाला विविध जिल्ह्यांमधील विविध शाळांमध्ये व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. 

*असा आहे विधानमंडप कक्ष -*

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आवारात स्वीप समितीच्यावतीने मतदार जनजागृतीच्या शेकडो संकल्पना असलेला सुमारे ६ हजार स्क्वेअर फुटांचा स्वीप कक्ष उभारला आहे. निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे विविध जनजागृतीपर पोस्टर्स, मतदान प्रक्रिया साध्या सोप्या सुलभ पद्धतीने दाखवणारे मुलांसाठीचे मनोरंजक खेळ, माझी सही-माझी लोकशाहीचा १०० टक्के मतदानाची सही असलेला उपक्रम, बाराखडीतून लोकशाही शिक्षण, जिल्हा स्वीप समितीचे विविध उपक्रम, मी महाराष्ट्र आहे – वैशिष्ट्यपूर्ण सेल्फी पॉईंट्स, क्यूआर कोड वॉल, व्हीआर बॉक्स रचना, व्हीव्हीपॅट मशीनविषयक साक्षरता, मतदानाची नोटा पद्धत, भारतातील पहिला स्वीप केअर व्हॉट्स अॅप क्रमांक, आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्यासाठी चित्रकला स्पर्धेतील पोस्टर्स, मतदार मार्गदर्शिका, राष्ट्रीय व राज्य सदिच्छा दूतांचे संदेश, विविध अॅपची माहिती, मतदान प्रक्रियेतील घटकांच्या चिकाटी व गुणवत्तेचे प्रतिक असलेली एकी नावाची मुंगी, सिनेमा व मालिकेतील गाजलेले संवाद व प्रसंगांवर आधारित मतदार जनजागृतीचे पोस्टर्स, भारत निवडणूक आयोगाची ऑनलाइन शपथ घ्या व प्रमाणपत्र मिळवा उपक्रम आदी उपक्रम या कक्षात आहेत. 

 हा कक्ष सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असून, शिक्षक, पालकांनी आपल्या मुलांसह या कक्षाला भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here