कोपरगावकरांच्या वाट्याला पुन्हा पहिले पाढे पंचावन्न …
कोपरगाव प्रतिनिधी :
विधानसभा निवडणुकांच्या काळात कोपरगाव नगर परिषदेकडून शहराला सुरु करण्यात आलेला तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा आता पुन्हा एकदा पूर्ववत करत ८ दिवसाआड करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुका संपल्या आहेत, मंत्रिमंडळ स्थापन झाले आता जनतेची – मतदारांची गरज संपल्याने निवडणुकी दरम्यान दिलेली आश्वासने हवेत विरली काय ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
कोपरगाव शहराला बऱ्याच वर्षानंतर आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पाच नंबर साठवण तलावातून निवडणुकीच्या अगोदर काही दिवस तीन दिवसात पाणीपुरवठा करण्यात आला. बऱ्याच वर्षानंतर तीन दिवसाआड पाणी मिळाल्याने महिलांसह मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र निवडणुका होऊन एक महिना पूर्ण होतो न होतो तोच कोपरगाव नगरपालिकेने पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा शहराला आठ दिवसात पाणी केले आहे. तसेच काही दिवसांपासून शहराला होणारा पाणीपुरवठा अतिशय गाळ मिश्रीत होत आहे. पालिकेने जरी दुरुस्तीचे कारण सांगितले असले तरी खरी खरे कारण पालिकेच्या साठवण तलावामध्ये पाणीच शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. नवीन पाच क्रमांक तलावात अवघे ८ फुट पाणी शिल्लक आहे. अपूर्ण कामामुळे त्यातून पाणी उचलणे शक्य नाही . तर चार , तीन, दोन, एक क्रमांकाच्या साठवण तलावांनी तळ गाठला आहे. पालिकेच्या पाणी पुरवठा योजनेस पाणी पुरवठा करणाऱ्या गोदावरी डाव्या कालव्यास दोन -अडीच महिन्यापूर्वी आवर्तन आले होते. आता रबी हंगाम सुरु होऊन दोन महिने होत आले तरी ना शेतीचे ना पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनाचे आद्याप तरी नियोजन दिसत नाही. आठ दिवसात आवर्तनाचे नियोजन न झाल्यास नागरिकांवर निर्जळीची परिस्थिती ओढावू शकते.
कोपरगाव नगरपालिकेवर गेल्या अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सभागृह अस्तित्वात नसून संपूर्ण पालिकेवर प्रशासक राजवट आहे. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक कामे रेंगाळले आहे. या अगोदरचे प्रशासक शांताराम गोसावी काळात देखील विकास कामांची व तसेच नागरिकांच्या अडीअडचणी संदर्भातील कामांची वाईट परिस्थिती होती दरम्यान त्यांची बदली झाल्याने नव्याने रुजू झालेले सुहास जगताप प्रशासक म्हणून रुजू झाले. मात्र पहिल्या परिस्थिती पेक्षा बत्तर परिस्थिती अनुभवायला मिळत आहेत. एक तर प्रशासक पालिकेत भेटतच नाही भेटले तर वेळ देत नाही. ते कामांमध्ये अतिशय व्यस्त असल्याचे भासवतात मात्र नागरी समस्यां मात्र जैसे थे आहे. शहरात वाढलेले धुळीचे साम्राज्य, रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, यामुळे जनता हवालदिल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधी शपथविधी व इतर धामधुमीमुळे मतदार संघात नाही यामुळे शहरात प्रशासकांवर व अधिकाऱ्यांवर कोणाचेही वचक नाही. असेच चित्र सध्या शहरात व तालुक्यात निर्माण झाले आहे. येणाऱ्या काळामध्ये विस्कटलेल्या नगरपालिका अथवा इतर शासकीय अधिकारी व कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांच्या कामांसाठी त्यांनी लक्ष घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. अन्यथा जनतेच्या रोशाला बळी पडावे लागेल यात शंका नाही.
धरण उशाला अन कोरड घशाला !
दोन महिन्यांहून अधिक दिवस होऊनही पुढील आवर्तनाचे नियोजन न झाल्याने डाव्या उजव्या कालव्यावरील पाणी पुरवठा योजना कोरड्या पडण्याची वेळ आली आहे . त्याच प्रमाणे शेतीचा रब्बी हंगाम सुरु होऊन दोन महिने होत आले आहेत . पिके पाण्यावर आली आहेत . असे असूनही कालवा सल्लागार समिती बैठक होत नाही . त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. तसेच मे-जून पर्यंतच्या पिकाचे नियोजन कसे करायचे आस प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जनतेने एव्हढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला जनादेश देऊनही राज्य सरकार आपल्यातील रुसवे फुगवे मिटविण्यात व्यस्त आहेत . तर डाव्या उजव्या कालव्यावरील लोकप्रतिनिधी कालवा सल्लागार समितीच्या बैठकाचे नियोजन करण्या ऐवजी मुंबईत तळ ठोकून बसले आहेत . पाणी पुरवठा करणारे जवळपास सर्वच धरणे सध्या काठोकाठ भरलेली असताना केवळ नियोजनाभावी पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ जनतेवर आली आहे. धरण उशाला अन कोरड घशाला ! केवळ हीच एकाच म्हण नवे तर पाण्याशी संबंधित सर्वच म्हणी आता डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभार्थ्यांना लागू पडत आहे.